बीएसएनएलचे रौप्यमहोत्सवी वर्ष उत्साहात साजरे
मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.) - देशातील विश्वासार्ह दूरसंचार सेवा प्रदाता भारत संचार निगम लिमिटेडने नुकतीच 25 वर्ष पूर्ण केली असून रौप्यमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले. 1 ऑक्टोबर 2000 रोजी स्थापन झालेल्या बीएसएनएलने शहरी तसेच ग्रामीण भागांना द
BSNL


मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.) -

देशातील विश्वासार्ह दूरसंचार सेवा प्रदाता भारत संचार निगम लिमिटेडने नुकतीच 25 वर्ष पूर्ण केली असून रौप्यमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले. 1 ऑक्टोबर 2000 रोजी स्थापन झालेल्या बीएसएनएलने शहरी तसेच ग्रामीण भागांना दूर संपर्काने जोडण्यात अग्रणी भुमिका पार पाडली, देशाच्या डिजिटल प्रगतीस आणि आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टांना महत्त्वपूर्ण आधार दिला आहे.

27 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातून बीएसएनएलच्या स्वदेशी 4 जी नेटवर्कचे उद्घाटन केले. स्वदेशी 4 जी ही योजना देशाच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरली असून, देशातच विकसित केलेल्या 4 जी कोअर व उपकरणांच्या आधारे उभारली गेली आहे. यामुळे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जलद विस्तारासाठी बळकट पाया घातला गेला आहे. रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनी बीएसएनएलने मुंबईत स्वदेशी ४ जी सेवांचा सॉफ्ट लाँच जाहीर केला. या प्रगत सेवेमुळे मुंबईतील लाखो ग्राहकांना अखंडित व वेगवान मोबाईल ब्रॉडबँड, सुधारित कव्हरेज आणि संपूर्णपणे स्वदेशी दूरसंचार प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डिजिटल सक्षमीकरणाचा लाभ मिळणार आहे.

बीएसएनएल व्होईफाय सेवा

नाविन्य आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोन दृढ करण्याच्या ध्येयाने बीएसएनएलने मुंबईत व्हॉइस ओव्हर वाय-फाय सेवा सुरू केली. या सेवेमुळे बीएसएनएलचे ग्राहक कोणत्याही वाय-फाय नेटवर्कचा वापर करून, अगदी कमी मोबाईल सिग्नल असलेल्या ठिकाणीही अखंडित, स्वच्छ व स्पष्ट संभाषण जोडणीचा अनुभव घेऊ शकणार आहेत. डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि ग्राहक सुविधेच्या दृष्टीने ही एक परिवर्तनकारी पायरी ठरली आहे.

बीएसएनएल ई-सिम सेवा

नवीन तांत्रिक प्रवाहाशी जुळवून घेत बीएसएनएलने 1 ऑक्टोबर 2025 पासून महाराष्ट्रात ई-सिम सेवा सुरू केली. ई-सिमच्या सहाय्याने बीएसएनएल ग्राहकांना अधिक सोयीस्कर सेवा, जलद सक्रियता आणि उपकरणांदरम्यान सहज स्विचिंगची सुविधा उपलब्ध झाली ज्यामुळे स्मार्टफोन वापरकर्ते तसेच आयओटी उपकरणांसाठी डिजिटल अनुभव अधिक समृद्ध झाला.

आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करताना बीएसएनएलने आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाप्रती वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. नेटवर्क आधुनिकीकरण, ग्रामीण-शहरी संपर्काची व्याप्ती वाढवणे आणि नाविन्यपूर्ण तसेच परवडणारी समाधानात्मक सेवा पुरविणे, यावर भर देत बीएसएनएलने भारताच्या डिजिटल उभारणीला पुढील अनेक दशकांसाठी बळकटी देण्याचा आपला निर्धार पुन्हा व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande