पणजी, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील ध्रुवीय आणि महासागरी संशोधन विषयक राष्ट्रीय केंद्राने (एनसीपीओआर) गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अंटार्क्टिकाला जाणाऱ्या ऐतिहासिक थेट हवाई कार्गो विमानाला एनसीपीओआरचे संचालक डॉ.थंबन मेलोथ यांनी हिरवा झेंडा दाखवून या हवाई कार्गो मोहिमेचा प्रारंभ केला.
“हा थेट मार्ग भारताच्या आत्मनिर्भर ध्रुवीय लॉजिस्टिक्स सेवेला बळकटी देतो आणि अत्याधुनिक अंटार्क्टिक संशोधनाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करतो,” डॉ. थंबन म्हणाले.
डीआरओएमएलएएन- संचालित आयएल-76 विमानाचा वापर करणाऱ्या या मोहिमेतून अंटार्क्टिक येथील भारतीय संशोधन केंद्रात कार्यरत असलेल्यांसाठी वैज्ञानिक उपकरणे, औषधे आणि वार्षिक तरतुदीच्या वस्तूंसह सुमारे 18 टन अत्यावश्यक साहित्य वाहून नेण्यात आले. या मोहिमेच्या सुरळीत परिचालनासाठी जीएमआर एअरो कार्गो अँड लॉजिस्टिक्स मधील ठाकूर पुरुषोत्तम सिंग, विश्राम सबनीस आणि अनुपकुमार लवंगाल यांनी परिश्रम घेतले आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या अल्फा कृक्स, अल्टिमा अंटार्क्टिक लॉजिस्टिक्स यांचे अमूल्य पाठबळ लाभले.
अंटार्क्टिक येथील परिचालन विभागाचे गट संचालक डॉ.शैलेन्द्र सैनी, वैज्ञानिक ई डॉ.योगेश रे, वैज्ञानिक ई डॉ.रवी मिश्रा, वैज्ञानिक ई आनंद कुमार सिंग, पीएस II यांत्रिक अभियंता राहुल कुमार, पीएस I इलेक्ट्रिक अभियंता अरिझ अहमद आणि कार्यकारी सहाय्यक ब्रिजेश देसाई यावेळी उपस्थित होते.
दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहर प्रवेशद्वारामार्गे जाणारी ही अग्रगण्य शिपमेंट भारताच्या ध्रुवीय मोहिमांसाठी लॉजिस्टिक्स विषयक कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. अंटार्क्टिका परिसरातील भारती तसेच मैत्री सारख्या भारतीय स्थानकांमध्ये सध्या सुरु असलेले हिमशिखरशास्त्र, समुद्रशास्त्र यांतील वैज्ञानिक संशोधन तसेच हवामान विषयक अभ्यास यांच्यासाठी हे कार्गो पाठबळ देणारे ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule