नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। यूपीएससी- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या निकालांविषयी दिशाभूल करणारी जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दृष्टी आयएएस या शिकवणी संस्थेला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दृष्टी आयएएसने आपल्या जाहिरातीत 2022 साली त्यांच्या संस्थेच्या 216 पेक्षा अधिक उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परिक्षेत निवड झाल्याचा दावा करत यशस्वी उमेदवारांची नावे आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली होती.
दरम्यान, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले असून, उमेदवारांनी संस्थेचे कोणते कोर्स आणि किती कालावधीसाठी केले यासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती लपवण्यात आली होती. मात्र, तपासणीत पुढे स्पष्ट झाले की, या 216 उमेदवारांपैकी 162 उमेदवारांनी संस्थेकडून केवळ निशुल्क मुलाखत मार्गदर्शन घेतले होते. तसेच त्या उमेदवारांनी यूपीएससीची प्राथमिक व मुख्य परीक्षा स्वबळावर उत्तीर्ण केल्यानंतर हे मार्गदर्शन घेतले होते. केवळ 54 उमेदवारांनी निशुल्क मुलाखत मार्गदर्शनासोबत इतर अभ्यासक्रम पूर्ण केले होते.
महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवून उमेदवार आणि पालकांची दिशाभूल करण्यात आली असून, उमेदवारांच्या सर्व टप्प्यांवरच्या यशासाठी दृष्टी आयएएसने महत्वाची भूमिका निभावली, असा चुकीचा समज त्यामुळे निर्माण झाला. ही बाब ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 2(28) अंतर्गत दिशाभूल करणारी जाहिरात ठरते.
दरम्यान, दृष्टी आयएएसवर यापूर्वीही दिशाभूल करणारी जाहीरात प्रसिद्ध केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता. सप्टेंबर 2024 मध्ये या संस्थेने 2021 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत 150 हून अधिक उमेदवारांची निवड केल्याच दावा केला होता. त्यावेळी संस्थेने 161 उमेदवारांची यादी सादर केली होती. पुढे तपासणीत आढळले की त्यापैकी 148 उमेदवार केवळ निशुल्क मुलाखत मार्गदर्शनासाठी, 7 जण मेन्स मेंटरशिप प्रोग्रॅमसाठी, 4 जण सामान्य अध्ययनसाठी 1 जण वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी दाखल होता, तर एका उमेदवाराची माहितीच उपलब्ध नव्हती. त्या वेळी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता आणि दिशाभूल करणारी जाहिरात तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले होते.
यापूर्वी दंड आकारुन आणि इशारा देवूनही दृष्टी आयएएसने 2022 च्या निकालांसाठी पुन्हा 216 हून अधिक निवड झाल्याचा दावा करून त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केली. त्यामुळे ग्राहक संरक्षण नियमांकडे संस्थेने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले.
अशा प्रकारे महत्त्वाची माहिती लपवल्याने संभाव्य विद्यार्थी आणि पालकांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019, कलम 2(9) अंतर्गत माहितीपूर्ण निवड करण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला. या जाहिरातींमुळे चुकीच्या अपेक्षा निर्माण झाल्या आणि ग्राहकांचे निर्णय अन्याय्य रीतीने प्रभावित झाले, विशेषतः जेव्हा मोठे दावे केले जातात परंतु, पारदर्शक माहिती दिली जात नाही.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आजपर्यंत अनेक दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व अन्याय्य व्यापार पद्धतींसाठी विविध कोचिंग संस्थांना 54 नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये 26 संस्थांवर एकूण 90.6 लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला असून, दिशाभूल करणारे दावे तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणीत सर्व संस्थांनी यशस्वी उमेदवारांनी कोणते कोर्स केले याची महत्त्वाची माहिती जाहिरातीत लपविल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे या जाहिराती कायद्यानुसार दिशाभूल करणाऱ्या ठरल्या आहेत.
केंद्रिय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सर्व शिकवणी संस्थांना स्पष्ट इशारा दिला असून, जाहिरातींमध्ये तथ्यांवर अधारित आणि पारदर्शक माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक योग्य आणि न्याय्य निर्णय घेऊ शकतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule