नाशिक : दसरा सणाला गालबोट; जुन्या वादातून गोरेवाडीत युवकाचा खून
नाशिक, 3 ऑक्टोबर, (हिं.स.) नाशिकरोडला जुन्या भांडणाच्या वादातून एका टोळक्याने युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गोरेवाडी परिसरात घडली. ऐन दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या घटनेने सणाला गालबोट लागले. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती
नाशिक : दसरा सणाला गालबोट; जुन्या वादातून गोरेवाडीत युवकाचा खून


नाशिक, 3 ऑक्टोबर, (हिं.स.) नाशिकरोडला जुन्या भांडणाच्या वादातून एका टोळक्याने युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गोरेवाडी परिसरात घडली. ऐन दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या घटनेने सणाला गालबोट लागले.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, काल गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी ज्योती मनोज अहिरे (वय ३२) या त्यांचा भाऊ कृष्णा व लहान बहिण छायासमवेत मतेश जेडगुले यांनी आयोजित केलेल्या दांडियाच्या कार्यक्रमाला गेले होते. रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दांडिया खेळून घरी जात असताना वाटेत त्यांना मोईन शेख भेटला. त्याच्यासोबत प्रकाश उर्फ असू बारसे व दोन विधिसंघर्षित बालके असे होते. दोन दिवसांपूर्वी कृष्णा आणि मोईन यांच्यात भांडण झाले होते. यावेळी मोईन कृष्णाला म्हणाला, आपण दोन दिवसांपूर्वी झालेला वाद बोलून मिटवून घेऊ. असे म्हणत ते सर्व जण कृष्णाला घेऊन जाधववाडीकडे गेले. त्यावेळी मोईनच्या कमरेला धारदार शस्त्र असल्याचे ज्योती अहिरे यांना दिसले. त्यांना शंका आल्याने त्या कृष्णाचा मित्र तिलक मेहरुलिया याला घेऊन त्यांच्या पाठिमागे गेले. संतोष जाधव यांच्या घराच्या पाठिमागे असलेल्या गल्लीत मोईन शेखने मागील भांडणाची कुरापत काढून कृष्णाच्या पाठित धारदार शस्त्र खुपसले. त्याचवेळी प्रकाश व एका विधिसंघर्षित बालकाने त्यांच्याकडील कोयत्याने कृष्णावर वार केले. हे सर्व जण कृष्णाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागले. हा सर्व प्रकार ज्योती आहिरे यांनी पाहिला. डोळ्यादेखत भावाला जिवे मारत असल्याचे पाहताच ज्योतीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सर्व आरोपी तेथून फरार झाले.

रक्ताच्या थारोळ्यात कृष्णा तिथे पडलेला असताना ज्योतीने तिलकच्या मदतीने कृष्णाला एका रिक्षात बसवून बिटको रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. तेथे डॉक्टरांनी कृष्णाला तपासून मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी तपासाची चक्रे फिरवत रात्रीच सर्व आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande