चंदीगड, 3 ऑक्टोबर (हिं.स.) - गेल्या चार वर्षांमध्ये सहकार मंत्रालयाने देशातील सर्व राज्य सरकारांच्या सहकार्याने सहकार क्षेत्राचा पाया मजबूत करण्याचे काम केले आहे. 2029 सालापर्यंत देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये सहकारी संस्था असेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते हरियाणामधील रोहतक येथे साबर डेरी प्लांटचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राने 70 टक्के वाढ नोंदवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे डेअरी क्षेत्र जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे दुग्धोत्पादन क्षेत्र बनले आहे. ते म्हणाले की, 2014-15 मध्ये भारतातील दुभत्या जनावरांची संख्या 86 दशलक्ष होती, त्यामध्ये वाढ होऊन आता ती 112 दशलक्ष वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे दूध उत्पादन 146 दशलक्ष टन वरून 239 दशलक्ष टन वर पोहोचले आहे. ते पुढे म्हणाले की, आपल्या देशातील शेतकऱ्यांनी भारतातील दरडोई दुधाची उपलब्धता 124 ग्रॅमवरून 471 ग्रॅमपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की, गेल्या 11 वर्षांत भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना समृद्धी लाभली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील सातत्यपूर्ण धोरणांमुळे आज भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून अभिमानाने उभा आहे, असे त्यांनी सांगितले. आपली सध्याची दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता दिवसाला 660 लाख लिटर आहे आणि 2028-29 पर्यंत ही क्षमता 100 दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले. एकदा हे ध्येय साध्य झाले की, सर्व नफ्याचा थेट लाभ दूध उत्पादन करणाऱ्या आपल्या शेतकरी माता भगिनींना मिळेल, असे ते म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, अलिकडेच मोदी सरकारने पशुखाद्य उत्पादन, खत व्यवस्थापन आणि मृत प्राण्यांच्या अवशेषांचा वापर चक्राकार अर्थव्यवस्थेत करण्यासाठी तीन राष्ट्रीय सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत.
अमित शाह म्हणाले की, आज, साबर डेअरीच्या माध्यमातून, देशातील दूध उत्पादकांच्या कल्याणासाठी सुमारे 350 कोटी रुपये खर्चाचा दही, ताक आणि योगर्ट उत्पादनाचा देशातील सर्वात मोठा प्लांट, बांधून पूर्ण झाला आहे. साबर प्लांटमध्ये दररोज 150 मेट्रिक टन दही, 10 मेट्रिक टन योगर्ट, 3 लाख लिटर ताक आणि 10,000 किलो मिठाईचे उत्पादन केले जाईल, ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. ते पुढे म्हणाले की, आज साबर डेअरी राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकऱ्यांना सेवा देत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी