मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधार कार्ड अपडेटसाठी लागणाऱ्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणारे हे नवे दर ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत लागू राहतील. त्यानंतर या शुल्कांचा पुनरावलोकन होईल आणि पुढील कालावधीसाठी म्हणजे १ ऑक्टोबर २०२८ पासून ३० सप्टेंबर २०३१ पर्यंत सुधारित दर आकारले जातील. नवीन नियमानुसार, प्रत्येकासाठी नवीन आधार कार्ड मोफत मिळणार आहे, मात्र नाव, पत्ता आणि कागदपत्रे बदलण्यासारख्या सेवांचे शुल्क आता ५० रुपयांवरून ७५ रुपये झाले आहे, तर बायोमेट्रिक अपडेटचे शुल्क १०० रुपयांवरून १२५ रुपये करण्यात आले आहे. मुलांचे आधार कार्ड अपडेट मात्र पूर्णपणे मोफत असेल.
यूआयडीएआयच्या सूचनेनुसार, ५ ते ७ वयोगटातील मुलांसाठी आणि १५ ते १७ वयोगटातील किशोरांसाठी बायोमेट्रिक अपडेट मोफत असेल. ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ही सेवा मोफत राहणार आहे. अन्य बायोमेट्रिक अपडेट्ससाठी मात्र १२५ रुपये आकारले जातील. विशेष म्हणजे, जर बायोमेट्रिक अपडेटसोबत नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता किंवा संपर्क तपशील असे डेमोग्राफिक अपडेट केले गेले तर त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क लागणार नाही, पण केवळ डेमोग्राफिक अपडेट केल्यास ७५ रुपये भरावे लागतील.
ऑनलाइन अपडेटबाबत यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे की myAadhaar पोर्टलवरून पत्ता आणि इतर डेमोग्राफिक तपशील १४ जून २०२६ पर्यंत मोफत अपडेट करता येतील. मात्र नोंदणी केंद्रात हे बदल केल्यास आता ७५ रुपये आकारले जातील. २०२८ नंतर पुन्हा शुल्कवाढ होणार असून ७५ रुपयांच्या सेवेसाठी ९० रुपये आणि १२५ रुपयांच्या सेवेसाठी १५० रुपये द्यावे लागतील. ईकेवायसी किंवा दुसऱ्या टूल्सच्या आधारे आधार प्रिंट आऊट काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात 40 रुपये दुसऱ्या टप्प्यात 50 रुपये द्यावे लागतील.
दरम्यान, यूआयडीएआयने गृह नोंदणी सेवा सुरू ठेवली असून तिचे शुल्क ७०० रुपये निश्चित केले आहे. यात जीएसटी समाविष्ट आहे. एका पत्त्यावर एकापेक्षा अधिक व्यक्तींना अपडेट करायचे असल्यास पहिल्या व्यक्तीसाठी ७०० रुपये आणि उर्वरित प्रत्येकासाठी ३५० रुपये आकारले जातील. या सेवेमध्ये यूआयडीएआयचे कर्मचारी प्रत्यक्ष घरी भेट देऊन आधारशी संबंधित काम करतात. वृद्ध, आजारी किंवा केंद्रात जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा विशेषतः उपयुक्त ठरेल.
यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे की आधार अपडेटसाठी मोबाईल नंबर अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. मोबाईल नंबर फक्त आधार केंद्रावरच अपडेट करता येतो. एकदा अपडेट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वापरकर्त्याला सेवा विनंती क्रमांक मिळतो, ज्याद्वारे त्याला आपले तपशील कधी अपडेट होतील हे ट्रॅक करता येते.
आधार अपडेट ठेवणे हे बँक खाते उघडण्यासाठी, सरकारी योजना घेण्यासाठी, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्डसाठी आवश्यक असल्याने महत्त्वाचे ठरते. यामुळे एखाद्या व्यक्तीची ओळख पडताळणे सोपे होते आणि फसवणुकीचा धोका कमी होतो. यूआयडीएआयने आधार पत्ता अपडेट करण्याची दोन पद्धती दिल्या आहेत—कागदपत्रांच्या आधारे किंवा कुटुंबप्रमुखाच्या परवानगीने. कुटुंबप्रमुखाच्या आधार क्रमांकाद्वारे पत्ता शेअर केल्यास देखील अपडेट शक्य आहे, मात्र यासाठी ७५ रुपये सेवा शुल्क भरावे लागेल.
यूआयडीएआयच्या या नवीन नियमांमुळे आधार अपडेट प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली असली तरी शुल्कवाढीमुळे नागरिकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule