नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर, (हि.स.)। भारतीय ‘अ’ महिला हॉकी संघ चीन दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. हा दौरा १३ ते २१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणार असून, भारत ‘अ’ संघ लियाओनिंग संघाविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. सर्व सामने डालियान येथील लियाओनिंग स्पोर्ट्स सेंटर येथे पार पडतील. हा दौरा भारतीय महिला हॉकीच्या नव्या पिढीला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव मिळवून देण्यासाठी आणि स्पर्धात्मक वातावरणाशी परिचित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
भारत ‘अ’ आणि लियाओनिंग यांच्यातील सामने अनुक्रमे १३, १५, १७, १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी खेळले जातील. भारतीय महिला हॉकी कार्यक्रमाच्या विकासाचा हा एक भाग असून, खेळाडूंना नव्या वातावरणात जुळवून घेण्यासाठी आणि उच्च दर्जाच्या आव्हानांसाठी सिद्ध करण्याचे उद्दिष्ट या दौऱ्यामागे आहे.या संघाचे नेतृत्व अनुभवी डिफेंडर मनीषा चौहान करणार असून, त्यांच्या नेतृत्वगुणांवर व रणनीतीवरील समजुतीवर सर्वांचा विश्वास आहे. संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी भारतीय महिला हॉकी संघाचे विश्लेषक प्रशिक्षक डेव्ह स्मोलेनर्स सांभाळणार आहेत.
डेव्ह स्मोलेनर्स म्हणाले,
“आम्ही एक संतुलित आणि तरुण संघ तयार केला आहे, ज्यात अपार क्षमता आहे. चीन दौरा खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्यासाठी, नव्या वातावरणातून शिकण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. मला विश्वास आहे की हे खेळाडू निर्धार आणि टीमवर्कच्या जोरावर या संधीचा पुरेपूर फायदा घेतील.”
भारत ‘अ’ महिला संघ (१९ सदस्यीय) – चीन दौरा २०२५
गोलकीपर – बंसरी सोलंकी, माधुरी किंडो
डिफेंडर – मनीषा चौहान (कर्णधार), अक्षता अबासो ढेकाळे, ज्योती छेत्री, महिमा चौधरी, अंजना डुंगडुंग
मिडफिल्डर – सुजाता कुजूर, दीपिका सोरेंग, अजमीना कुजूर, पूजा यादव, बलजीत कौर, दिपी मोनिका टोप्पो
फॉरवर्ड – अलबेला रानी टोप्पो, ऋतिका सिंह, अन्नु, चंदना जगदीशा, काजल सदाशिव अटपदकर, सेलेस्टिना होरो
-------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर