क्वॉलालंपूर , 3 ऑक्टोबर (हिं.स.)। सामाजिक सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भातील मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांची दखल घेत आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षितता संघटनेने (आयएसएसए) भारताला ‘सामाजिक सुरक्षितता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी’साठीचे प्रतिष्ठित आयएसएसए पारितोषिक 2025 देऊन गौरव करण्यात आला.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री तसेच युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी भारतातील सामाजिक सुरक्षिततेच्या कवचात वर्ष 2015 मधील 19% पासून वर्ष 2025 मध्ये 64.3% पर्यंत झालेल्या ऐतिहासिक विस्ताराद्वारे 940 दशलक्ष नागरिकांना हे संरक्षण उपलब्ध झाले असून आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) हा महत्वाचा टप्पा असल्याचे मान्य केले आहे ही बाब अधोरेखित केली.
मलेशियात कौलालंपूर येथे झालेल्या जागतिक सामाजिक सुरक्षितता मंच (डब्ल्यूएसएसएफ) 2025 च्या कार्यक्रमात उपस्थितांना उद्देशून ते बोलत होते. सदर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षितता संघटनेतर्फे (आयएसएसए) ‘सामाजिक सुरक्षितता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी’साठीचे प्रतिष्ठित आयएसएसए पारितोषिक 2025 देऊन भारताचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक सुरक्षितता कवचात झालेल्या वाढीनंतर, आता भारताचा आयएसएसएच्या महासभेतील वाटा 30 पर्यंत वाढला असून कोणत्याही देशाकडे असलेले हे सर्वाधिक मत सामर्थ्य आहे.
भारत सरकारच्या वतीने उपरोल्लेखित पुरस्कार स्वीकारताना केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला तसेच समावेशक आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला सक्षम करत सार्वत्रिक सामाजिक सुरक्षिततेच्या दिशेने सुरु असलेल्या वाटचालीला आकार देणाऱ्या आपल्या अंत्योदयाच्या मार्गदर्शक तत्वांना मिळालेल्या मान्यतेचा पुरावा आहे.”
या त्रैवार्षिक पुरस्कारामुळे जागतिक पातळीवर सामाजिक सुरक्षितता यंत्रणांमध्ये भारताने केलेल्या प्रगतीला मान्यता मिळाली आहे. हा पारितोषिक सोहोळा डब्ल्यूएसएसएफच्या जगभरातील 163 देशांतून आलेल्या 1,200 हून अधिक सामाजिक सुरक्षाविषयक धोरणकर्त्यांच्या प्रमुख जागतिक मेळाव्यातील परमोच्च बिंदू ठरला. या पुरस्काराची सुरुवात झाल्यापासून भारत हा पाचवा पुरस्कार विजेता देश ठरला असून याद्वारे सामाजिक सुरक्षितता कवचाच्या क्षेत्रातील अग्रगण्य देशांच्या गटात भारताने स्थान मिळवले आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात ई-श्रम पोर्टलच्या विशेष उल्लेखासह देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत सामाजिक सुरक्षिततेचे लाभ परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी भारतात स्थापन करण्यात आलेल्या विस्तृत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या स्थापनेविषयी माहिती दिली. ई-श्रम पोर्टल हा एक राष्ट्रीय डिजिटल माहितीकोष असून तो बहुभाषिक, सुलभ सुविधेच्या माध्यमातून 310 दशलक्षाहून अधिक असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांशी जोडून “एक-थांबा सुविधा केंद्र” म्हणून कार्य करतो,”ते म्हणाले.
नोकऱ्या शोधणारे आणि नियोक्ते यांना सामायिक मंचावर एकत्र आणण्यासाठी मजबूत डिजिटल साधनांनी सुसज्ज असलेल्या राष्ट्रीय करियर सेवा (एनसीएस) पोर्टलकडे देखील केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीय यांनी सर्वांचे लक्ष वेधले. “आजघडीला, एनसीएसकडे कुशल कार्यबळाचा प्रमाणिकृत माहितीसंग्रह असून तो जगभरातील नियोक्त्यांना सहजपणे उपलब्ध आहे आणि ई-श्रम पोर्टलसह त्याचे एकत्रीकरण केलेले आहे. यातून, आपल्या कुशल तरुणांना त्यांचे सामाजिक सुरक्षितताविषयक लाभ न गमावता जागतिक संधी उपलब्ध होतील याची सुनिश्चिती झाली आहे,” ते पुढे म्हणाले.
दिवसाच्या सुरुवातीला, जागतिक सामाजिक सुरक्षितता परिषदेच्या विशेष सत्रात बोलताना, डॉ. मनसुख मांडवीय यांनी देशभरातील कामगारांना आरोग्यसुविधा, विमा संरक्षण तसेच निवृत्तीवेतन योजनांचे लाभ मिळवून देण्यात कामगार भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आणि कामगार राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) या भारतातील दोन आघाडीच्या सामाजिक सुरक्षितताविषयक संघटनांची भूमिका अधोरेखित केली.
तंत्रज्ञानसंबंधित आणि कामगार बाजारपेठ संबंधित बदलांसोबत सामाजिक सुरक्षिततेच्या उदयाला येणाऱ्या भूमिकेबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “आम्ही सर्वसमावेशक धोरण, प्रक्रिया तसेच डिजिटल सुधारणांच्या माध्यमातून आपली सामाजिक सुरक्षितता अधिक बळकट करत आहोत. नव्या रोजगार संधी आणि सामाजिक सुरक्षिततेचे जाळे निर्माण करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून घेत असून वित्तीय पोहोच, कौशल्य, स्वयंरोजगार आणि डिजिटल नवोन्मेष यांचा मेळ घालणाऱ्या समग्र दृष्टीकोनाच्या माध्यमातून हे साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
“भविष्य घडवण्यासाठी आणि जगभरातील तरुणांना प्रेरित करण्यासाठी सज्ज असलेला भारत आज अग्रस्थानी उभा आहे,” त्यांनी ठामपणे सांगितले.तंत्रज्ञानसंबंधित आणि कामगार बाजारपेठ संबंधित बदलांसोबत सामाजिक सुरक्षिततेच्या उदयाला येणाऱ्या भूमिकेबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “आम्ही सर्वसमावेशक धोरण, प्रक्रिया तसेच डिजिटल सुधारणांच्या माध्यमातून आपली सामाजिक सुरक्षितता अधिक बळकट करत आहोत. नव्या रोजगार संधी आणि सामाजिक सुरक्षिततेचे जाळे निर्माण करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून घेत असून वित्तीय पोहोच, कौशल्य, स्वयंरोजगार आणि डिजिटल नवोन्मेष यांचा मेळ घालणाऱ्या समग्र दृष्टीकोनाच्या माध्यमातून हे साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” “भविष्य घडवण्यासाठी आणि जगभरातील तरुणांना प्रेरित करण्यासाठी सज्ज असलेला भारत आज अग्रस्थानी उभा आहे,” त्यांनी ठामपणे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule