इस्लामाबाद, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील प्रेस क्लबवर गुरुवारी (दि.२) पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि पीओकेमध्ये झालेल्या अत्याचार आणि इंटरनेट ब्लॅकआउटच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या पत्रकारांवर आणि लोकांवर हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली. गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस पत्रकारांवर लाठीमार करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी म्हटले आहे की, त्यांनी चुकून पत्रकारांना लक्ष्य केले. पीओकेमधील परिस्थितीबाबत प्रेस क्लबबाहेर निदर्शने मोडून काढण्यासाठी ते आले तेव्हा हे घडल्याचे वृत्त आहे. यावेळी निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू झाला. काही निदर्शक प्रेस क्लबमध्ये धावले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. आत पोलिसांनी लाठीमार सुरू केला आणि जेव्हा पत्रकारांनी त्यांच्या मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांनी घटना रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली.
व्हिडिओमध्ये असेही दिसून आले आहे की पोलिस काही निदर्शकांना ओढून नेत आहेत. प्रेस क्लबचे किमान दोन छायाचित्रकार आणि तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. अनेक पत्रकारांचे कॅमेरे आणि मोबाईल फोन तोडण्यात आले आहेत.
पोलिस हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर व्यापक संताप व्यक्त झाला. वरिष्ठ पत्रकारांनी याला प्रेस स्वातंत्र्यावर थेट हल्ला म्हटले. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनीही या घटनेची दखल घेत छाप्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी एका निवेदनात म्हटले, “ही दुर्दैवी घटना असून, मी इस्लामाबाद पोलिस आयुक्तांकडून तातडीने अहवाल मागवला आहे. पत्रकारांवरील हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाऊ शकत नाही. या घटनेत सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी.”
तर गृहराज्यमंत्री तलाल चौधरी यांनी प्रेस क्लबमध्ये येऊन पत्रकारांची माफी मागितली. चौधरी म्हणाले की, काही निदर्शकांनी पोलिसांशी गैरवर्तन केले होते आणि त्यांना पकडण्यासाठी पोलिस क्लबमध्ये घुसले होते, परंतु तेथे पत्रकारांशी झटापट झाली.सरकार चौकशी करेल आणि जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईल असे आश्वासन त्यांनी दिले. तुमचे आवाज आम्हाला जनतेसमोर आणतात, आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक आहोत, असे चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले.
पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोग (एचआरसीपी) ने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले, “ एचआरसीपी नेशनल प्रेस क्लबवरील छापा आणि इस्लामाबाद पोलिसांनी पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याची तीव्र निंदा करतो. आम्ही त्वरित चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो.”संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानच्या माजी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनीही या घटनेचा निषेध केला आणि उत्तरदायित्वाची मागणी केली. त्यांनी पोस्ट केलं, “हे अत्यंत निंदनीय आहे. यासाठी परवानगी कुणी दिली? इस्लामाबाद पोलिसांनी नेशनल प्रेस क्लबवर धाड घातली – हे अत्यंत धक्कादायक आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode