जळगाव , 3 ऑक्टोबर (हिं.स.) शहरातील कासमवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास जुन्या वैमनस्यातून घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. दोन तरुणांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका जाधव (वय २७, रा. कासमवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एका संशयिताला ताब्यात घेतले असून, दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. नाना जाधव याचा परिसरातील काही तरुणांशी पूर्वीपासून वाद होता. दसऱ्याच्या रात्री तो एकता मित्र मंडळाजवळ उभा असताना, दोन हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. जुन्या रागातून त्यांनी धारदार शस्त्राने नानाच्या पोटात आणि मांडीवर अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या नानाला मित्रांनी तातडीने दुचाकीवरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. अतीदक्षता विभागात उपचार सुरू असताना, गंभीर जखमांमुळे अवघ्या तासाभरात त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजताच नातेवाइकांनी रुग्णालयात आक्रोश केला. परिसरात मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या पथकाने तातडीने रुग्णालय गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती देत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर