खडसेंच्या बंगल्यातील घरफोडी प्रकरणात चोरट्यांना आश्रय देणाऱ्यावर गुन्हा
जळगाव, 31 ऑक्टोबर (हिं.स.) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात झालेल्या घरफोडी प्रकरणात महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. या घरफोडीतील तिघा संशयित चोरट्यांना वास्तव्याची सोय करून देणाऱ्या घरमालकाविरुद्
खडसेंच्या बंगल्यातील घरफोडी प्रकरणात चोरट्यांना आश्रय देणाऱ्यावर गुन्हा


जळगाव, 31 ऑक्टोबर (हिं.स.) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात झालेल्या घरफोडी प्रकरणात महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. या घरफोडीतील तिघा संशयित चोरट्यांना वास्तव्याची सोय करून देणाऱ्या घरमालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिस तपासानुसार, खडसेंच्या बंगल्यात २८ ऑक्टोबरच्या पहाटे झालेल्या घरफोडीत सहभागी तिघे संशयित मुंबईतील उल्हासनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या शोधासाठी रामानंदनगर पोलिसांचे विशेष पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. तपासादरम्यान या तिघांनी जळगावातील मास्टर कॉलनीत जियाउद्दीन शेख हुस्नोद्दीन शेख (वय ३९) या व्यक्तीच्या घरात वास्तव्यास असल्याचे समोर आले. या माहितीनंतर पोलिसांनी जियाउद्दीन शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान समजले की, चोरट्यांनी घरफोडीपूर्वी १९ ऑक्टोबर रोजी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात प्रवेश केला होता. त्यांनी त्या वेळी मावसभावाचे घर भाड्याने घेतले आणि चार-पाच दिवस मुक्काम करून मुंबईला परत गेले. नंतर २४ ऑक्टोबरला पुन्हा जळगावात येऊन २७ ऑक्टोबरच्या पहाटे खडसेंच्या बंगल्यात चोरी करून फरार झाले. दरम्यान, चोरट्यांनी १९ ते २७ ऑक्टोबरदरम्यान शहरातील अनेक ठिकाणी रेकी केल्याची माहितीही पोलिसांच्या हाती आली आहे. या अनुषंगाने तपास अधिक गतीने सुरू असून, संशयितांना लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande