जगदलपूर, 04 ऑक्टोबर (हिं.स.) : नक्षलवाद्यांना कुठल्याही परिस्थितीत शस्त्रत्याग करून सरकारचे आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरण स्वीकारावे लागेल. त्यांच्याशी चर्चेची काहीच शक्यता नसल्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. छत्तीसगडच्या 2 दिवसीय दौऱ्यावर असलेले शाह बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर येथे आयोजित ‘बस्तर दसरा लोकोत्सव’ आणि ‘स्वदेशी मेळा’ या कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी नक्षलविरोधी धोरणावर ठाम भूमिका मांडताना शाह म्हणाले की, आगामी 31 मार्च 2025 ही नक्षलवाद संपवण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. गावातील युवकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे आणि बस्तरच्या विकासात सहभागी व्हावे. जर कोणी बस्तरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांसह सुरक्षा दल कठोर कारवाई करतील असा इशारा त्यांनी दिला.
नक्षलवादाचा मूळ अडसर - विकास
शहा यांनी सांगितले की दिल्लीतील काही लोक हे चुकीचे चित्र रंगवतात की नक्षलवादाचा जन्म विकासाच्या लढ्यातून झाला. वास्तविक, नक्षलवादामुळेच बस्तरचा विकास खुंटला आहे. आज देशाच्या बहुतांश भागांमध्ये वीज, पाणी, रस्ते, आरोग्य विमा आणि मोफत तांदूळ यांसारख्या मूलभूत सुविधा पोहोचल्या आहेत. मात्र, बस्तर या विकासापासून अद्यापही वंचित आहे.
छत्तीसगड सरकारने राबवलेले आत्मसमर्पण धोरण देशातील सर्वोत्कृष्ट आहे. एका महिन्यात 500हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. प्रत्येकाने शस्त्र खाली ठेवावे आणि मुख्य प्रवाहात यावे. नक्षलमुक्त गावांसाठी सरकारकडून 1 कोटी रुपयांचा विकास निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दसरा उत्सव आणि मुरिया दरबारचा गौरव
अमित शहा यांनी माँ दंतेश्वरी मंदिरात दर्शन घेतले आणि बस्तरला नक्षलमुक्त करण्याची प्रार्थना केली. त्यांनी ‘मुरिया दरबार’ या ऐतिहासिक परंपरेचे कौतुक करत सांगितले की, 1874 पासून ही परंपरा न्याय, संवाद आणि जनसहभागाचे प्रतीक राहिली आहे.या कार्यक्रमात शहा यांच्या हस्ते ‘महतारी वंदन योजना’ अंतर्गत 65 लाख महिलांच्या खात्यात 1000 रुपयांचा 20वा मासिक हप्ता जमा करण्यात आला. तसेच ‘मुख्यमंत्री ग्रामीण बस सेवा योजना’ चेही उद्घाटन करण्यात आले, ज्याचा फायदा आदिवासीबहुल बस्तर व सरगुजा भागांना होणार आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी