पटना, 04 ऑक्टोबर (हिं.स.) : बिहारमध्ये आयोजित कौशल्य दिक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तरुणांसाठी विविध योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा केल्यात. विशेष म्हणजे बिहारच्या तरुणांसाठी यामध्ये महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या, ज्यामुळे ते सरकारच्या धोरणांप्रती अधिक आकर्षित झालेले दिसले.
या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री जुएल ओरांव आणि राजीव रंजन यांनी व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग घेतला. कार्यक्रमाची प्रस्तावना कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी केली, तर शिक्षण राज्य मंत्री सुकांता माजूमदारही व्यासपीठावर उपस्थित होते
पंतप्रधान मोदींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा शुभारंभ केला आणि बिहारच्या अतीताचा उल्लेख करत राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) शासनकाळाला कुशासन (वाईट प्रशासन) असे संबोधले. तर, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. जननायक कर्पूरी ठाकूर कौशल्य विद्यापीठाचं व्हर्च्युअल उद्घाटन करताना पंतप्रधानांनी कोणतंही नाव न घेता विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, थोडं सावध रहा, हे ‘जननायक’ पद कर्पूरी ठाकूर यांच्यामुळे आहे. आजकाल काही लोक ‘जननायक’ उपाधीही चोरण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे बिहारच्या जनतेला मी जागरूक राहण्याचं आवाहन करतो, की कर्पूरी ठाकूर यांना जनतेनं दिलेला हा सन्मान कुणी चोरून नेऊ नये.या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात हे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेली अप्रत्यक्ष टिप्पणी मानली जात आहे, कारण अलीकडे काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना 'जननायक' ही उपाधी दिली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की,अलीकडेच मला बिहारमधील बहिणींच्या रोजगार आणि स्वावलंबन विषयक भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. आजचं हे कार्यक्रम बिहारच्या तरुणांच्या सशक्तीकरणासाठीचं एक मोठं पाऊल आहे. यावरून हे स्पष्ट होते की एनडीए सरकार बिहारच्या युवकांना आणि महिलांना किती महत्त्व देते.या मंचावरून बिहारच्या युवकांसाठी अनेक योजना आणि प्रकल्पांची घोषणा झाली:
नवीन कौशल्य विद्यापीठाची स्थापना, इतर विद्यापीठांमध्ये सुविधांचा विस्तार,युवा आयोगाची निर्मिती,हजारो युवकांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे, दरमहा 1000 रुपये अनुदान – 'मुख्यमंत्री निश्चय स्वयं-सहायता भत्ता योजना' अंतर्गत 5 लाख पदवीधरांना 2 वर्षांपर्यंत शिष्यवृत्तीमध्ये वाढ – पूर्वी ₹1800 होती, आता ₹3600 करण्यात आली आहेस्टुडंट क्रेडिट कार्डवरील कर्जावरील व्याज शून्य करण्यात आलं आहे
पंतप्रधान म्हणाले की, “एनडीएची डबल इंजिन सरकार बिहारच्या शैक्षणिक संस्थांना आधुनिक बनवण्यासाठी सातत्याने काम करत आहे. आयटीआय पटना मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर विस्ताराचं काम सुरु झालं आहे. एनआयटी पटना चा बिहटा कॅम्पस आता विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. याशिवाय पटना विद्यापीठ, भूपेंद्र मंडल विद्यापीठ, जयप्रकाश विद्यापीठ, छपरा, आणि नालंदा ओपन विद्यापीठ इत्यादी ठिकाणी नवीन शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत.पंतप्रधानांनी यावेळी 60 हजार कोटीं रुपयांच्या ‘पीएम सेतु’ योजनेचीही घोषणा केली, ज्याअंतर्गत 1000 पेक्षा अधिक आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालये आणि एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये 1200 स्किल लॅब्सचं व्हर्च्युअल उद्घाटन करताना भारत हा ज्ञान आणि कौशल्यांचा देश आहे, हीच आपली बौद्धिक ताकद असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
-------------------
.
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी