वॉशिंग्टन, ४ ऑक्टोबर (हिं.स.) : पॅलेस्टिनी मिलिशिया गट हमासने अमेरिकेच्या गाझा शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. शांतता प्रस्तावाचा भाग म्हणून हमासने सर्व जिवंत किंवा मृत इस्रायली ओलिसांची सुटका करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता प्रस्ताव स्वीकारण्यासाठी हमासला अंतिम मुदत दिल्यानंतर लगेचच हमासने ही घोषणा केली. त्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायलला गाझावरील बॉम्बहल्ला ताबडतोब थांबवण्याचे आवाहन केले. हमासने मध्यस्थी चर्चेत तात्काळ सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे, ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केले आहे. ट्रुथ सोशलवर त्यांनी लिहिले आहे की, हमासने जारी केलेल्या विधानाच्या आधारे, मला विश्वास आहे की, ते कायमस्वरूपी शांततेसाठी तयार आहेत. ट्रम्प यांनी इस्रायलने गाझावरील बॉम्बहल्ला ताबडतोब थांबवण्याची गरज व्यक्त केली जेणेकरून ओलिसांना शक्य तितक्या लवकर सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. ट्रम्प यांच्या गाझा योजनेवर तपशीलवार चर्चा करण्यासाठी मध्यस्थांद्वारे तात्काळ वाटाघाटी करण्यास हमास तयार असल्याचे हमासने म्हटले आहे. हमासने गाझाचे प्रशासन स्वतंत्र तांत्रिक तज्ञांच्या पॅलेस्टिनी संस्थेकडे सोपवण्याची तयारी पुन्हा एकदा दर्शविली. हमासने पूर्वी गाझाचे प्रशासन केले होते. हमास योजनेच्या अटींनुसार उर्वरित सर्व ४८ ओलिसांना सोडण्यास तयार आहे,.ज्यामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदी लागू झाल्यानंतर ७२ तासांच्या आत त्यांची सुटका, २००० हून अधिक पॅलेस्टिनी सुरक्षा कैदी आणि मृत गाझाच्या नागरिकांचे मृतदेह यांचा समावेश आहे. त्यानंतर इस्रायल गाझातून माघारीचा पहिला टप्पा पूर्ण करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत इस्रायलशी शांतता करार करण्यासाठी हमासला अल्टिमेटम दिला होता. त्यांनी सांगितले की, हमासला गाझा योजना स्वीकारण्याची आणि इस्रायली ओलिसांना सोडण्याची शेवटची संधी दिली जात आहे. जर ते सहमत झाले नाहीत तर त्याचे परिणाम वाईट होतील. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्याशी अमेरिकन शांतता योजनेवर चर्चा केली आणि दोघांमध्ये एक करार झाला. ३० सप्टेंबर रोजी,इजिप्त, जॉर्डन, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, तुर्की, इंडोनेशिया आणि पाकिस्तान यांनी ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला पाठिंबा देणारे संयुक्त निवेदन जारी केले होते. अमेरिकेच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत हमास ४८ इस्रायली बंधकांना तात्काळ सोडेल, ज्यापैकी अंदाजे २० जण जिवंत असल्याचे मानले जाते. त्यांना सत्ता आणि शस्त्रे सोडावी लागतील. इस्रायल गाझामधील आपल्या कारवाया थांबवेल, बहुतेक भागातून माघार घेईल, शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल आणि मानवतावादी मदत आणि पुनर्बांधणीला परवानगी देईल. गाझामधील सुमारे २० लाख पॅलेस्टिनींसाठी आंतरराष्ट्रीय प्रशासन लागू केले जाईल. ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये लष्करी कारवाई सुरू केली होती. ज्याचा परिणाम संपूर्ण मध्य पूर्वेवर झाला आहे.
२० कलमी गाझा शांतता योजनेत विशेष काय आहे:
- इस्रायल गाझामधील लष्करी कारवाया तात्काळ थांबवेल आणि टप्प्याटप्प्याने सैन्य मागे घेईल.
- हमास ७२ तासांच्या आत सर्व बंधकांना सोडेल.
- इस्रायल जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या २५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल. याव्यतिरिक्त, ताब्यात घेतलेल्या १,७०० गाझावासीयांनाही सोडले जाईल.
- शांततेने एकत्र राहण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या हमास सदस्यांना माफी दिली जाईल.
- मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदतीचा भाग म्हणून दररोज किमान ६०० ट्रक मदत साहित्य गाझामध्ये पोहोचेल.
- गाझाच्या प्रशासनात हमासची कोणतीही भूमिका राहणार नाही आणि सर्व दहशतवादी बोगदे आणि लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्या जातील.
- गाझाचे प्रशासन आंतरराष्ट्रीय समितीच्या देखरेखीखाली पॅलेस्टिनी तांत्रिक तज्ञांच्या हाती असेल.
- गाझा हा दहशतवादमुक्त क्षेत्र बनवला जाईल.
- गाझामध्ये पुनर्बांधणी आणि विकासाचे काम सुरू होईल.
- इस्रायल गाझाला जोडणार नाही किंवा कायमचा ताब्यात घेणार नाही.
- इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षाच्या राजकीय तोडग्यासाठी अमेरिका वाटाघाटी पुढे नेईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे