नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबई, 04 ऑक्टोबर (हिं.स.) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार असून, यामुळे मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतुकीवरी
नरेंद्र मोदी


नवी मुंबई, 04 ऑक्टोबर (हिं.स.) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार असून, यामुळे मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अदानी समूहाचा 74 टक्के तर महाराष्ट्र सरकारच्या सिडको संस्थेचा 26 टक्के हिस्सा आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 19 हजार 647 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, तर संपूर्ण प्रकल्पाचे बजेट 1 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

या नव्या विमानतळाला 30 सप्टेंबर रोजी नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (डीजीसीए) उड्डाण परवाना प्राप्त झाला असून, डिसेंबर 2025 पासून येथे व्यावसायिक उड्डाणे सुरू होणार आहेत. एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर या देशांतर्गत विमान कंपन्यांनी त्यांच्या काही सेवा या नवीन विमानतळावर हलवण्याची घोषणा केली आहे.

‘NMI’ कोड आणि जागतिक दर्जाचे सुविधासंपन्न केंद्र

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (आयएटीए) या विमानतळाला ‘एनएमआय’ हा कोड दिला आहे. 1160 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या विमानतळाचे 4 टर्मिनल टप्प्याटप्प्याने उभारले जात आहेत. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर हे केंद्र दरवर्षी 9 कोटी प्रवासी आणि 32.5 लाख टन कार्गो हाताळू शकणार आहे, ज्यामुळे आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक म्हणून याची ओळख निर्माण होणार आहे. सध्या प्रथम टर्मिनल पूर्ण झाले असून, त्याची क्षमता 2 कोटी प्रवासी आणि 8 लाख टन कार्गो इतकी आहे. यासाठी स्वतंत्र धावपट्टी देखील बांधण्यात आली आहे.

संपूर्ण मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी

हे भारतातील पहिले विमानतळ आहे जे एक्सप्रेसवे, महामार्ग, मेट्रो, उपनगरी रेल्वे आणि वॉटर टॅक्सी यांसारख्या वाहतूक व्यवस्थेशी जोडलेला असेल. ऑटोमेटेड पॅसेंजर मूव्हमेंट सिस्टममुळे प्रवाशांना सर्व टर्मिनलमध्ये सहज हालचाल करता येणार आहे.तसेच, हा एक ‘हरित’ विमानतळ ठरेल, कारण येथे शाश्वत विमान इंधन साठवण्याची सुविधाही उपलब्ध असेल.

विमानतळाला डी.बी. पाटील यांचे नाव

या विमानतळाचे नामकरण स्वर्गीय डी.बी. पाटील यांच्या नावाने करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. डी.बी. पाटील हे सामाजिक कार्यकर्ते होते, ज्यांनी या प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला होता. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी या नावास मान्यता दिली असून, व्यावसायिक सेवा सुरू झाल्यावर नवीन अधिकृत नाव जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पंतप्रधानांचा दौरा आणि उद्घाटन कार्यक्रम

आगामी 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.40 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. सुमारे 2 तास विमानतळावर थांबून ते प्रथम टर्मिनलची पाहणी करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी दिली.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande