जागतिक शिक्षक दिन : बुद्धकालीन गुरू व आधुनिक शिक्षक
मानव इतिहासातील प्रत्येक युगात शिक्षक हा समाजाचा केंद्रबिंदू राहिला आहे. ज्ञान, संस्कार, मूल्ये, नैतिकता आणि जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक. म्हणूनच ५ ऑक्टोबर हा दिवस जगभर ‘जागतिक शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. युनेस्कोने १९९४ साली य
जागतिक शिक्षक दिन


मानव इतिहासातील प्रत्येक युगात शिक्षक हा समाजाचा केंद्रबिंदू राहिला आहे. ज्ञान, संस्कार, मूल्ये, नैतिकता आणि जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक. म्हणूनच ५ ऑक्टोबर हा दिवस जगभर ‘जागतिक शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. युनेस्कोने १९९४ साली या दिवसाची सुरुवात केली आणि तेव्हापासून संपूर्ण जगात शिक्षकांच्या योगदानाचा गौरव होत आहे. पण शिक्षक संकल्पना समजून घेण्यासाठी आपण केवळ आधुनिक काळात न थांबता प्राचीन काळात, विशेषतः बुद्धकालीन परंपरेत डोकावले पाहिजे. कारण त्या काळातील शिक्षण व शिक्षकाची भूमिका आजच्या काळातील शिक्षकांना प्रेरणा देणारी ठरते. बुद्धकालीन संदर्भ आणि आधुनिक संदर्भ या दोन परंपरांचा संगम म्हणजेच खऱ्या अर्थाने शिक्षक दिनाचा सखोल अर्थ होय. बुद्धकाल हा भारतीय समाजजीवनातील बौद्धिक आणि सामाजिक परिवर्तनाचा कालखंड मानला जातो. त्या काळातील शिक्षक म्हणजे गुरु हे शिष्यांना फक्त ग्रंथपठण शिकवणारे नव्हते, तर ते जीवनमूल्यांचे शिल्पकार होते. गुरुकुल प्रणालीमध्ये शिष्य आपले संपूर्ण जीवन गुरुंच्या मार्गदर्शनाखाली व्यतीत करीत असत. ज्ञानासोबत संयम, सत्य, प्रामाणिकपणा, करुणा आणि समता यांचे शिक्षण दिले जाई. बुद्धकालीन शिक्षकांचा केंद्रबिंदू म्हणजे समाजहित. ते फक्त वैयक्तिक यशावर भर देत नसून शिष्यांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत.

गौतम बुद्ध स्वतः सर्वोत्तम शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ज्ञानसंपादनाची नवी दृष्टी दिली. अप्प दीपो भव म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा, हा त्यांचा उपदेश शिष्यांना आत्मनिर्भरतेचे धडे देणारा होता. त्यांनी कधीही अंधानुकरणाची शिकवण दिली नाही; उलट विवेकबुद्धी, तपासणी, शंका आणि संवाद यांवर आधारित शिक्षणपद्धती त्यांनी रुजवली. शिष्यांना त्यांनी सांगितले की तुम्ही माझ्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवू नका, विचार करा, अनुभव घ्या आणि मग स्वीकारा. हीच खरी गौतम बुद्धांची वैज्ञानिक वृत्ती होती. या विचारसरणीमुळे शिक्षकाची भूमिका म्हणजे तर्कबुद्धी जागवणारा आणि विवेक विकसित करणारा असा होती. बुद्धकालीन विहार आणि विद्यापीठे ही शिक्षक-शिष्य संबंधांची केंद्रे होती. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला यांसारख्या विद्यापीठांत शिक्षक केवळ विद्वान नव्हते तर समाजदूत होते. शिष्यांना ग्रंथपठणाबरोबर समाजसुधारक मूल्यांचे धडे दिले जात. पंचशील, अष्टांगिक मार्ग, करुणा आणि अहिंसा या बौद्ध मूल्यांवर आधारित शिक्षण हीच त्या काळातील शिक्षकांची खरी देणगी होती. शिक्षण हे फक्त ज्ञानसंपादनासाठी नसून समाजातील विषमता दूर करण्यासाठी आणि मानवी जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, हेच तत्त्व ते शिकवीत.

आजच्या आधुनिक काळात शिक्षकांची भूमिका बदलली असली तरी तिचे सार तेच आहे. आज माहितीच्या युगात प्रत्येकाकडे ज्ञानसाधने सहज उपलब्ध आहेत. इंटरनेट, स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑनलाइन शिक्षण इत्यादी. या सर्वांमुळे शिक्षकाचे काम केवळ माहिती पुरविण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. शिक्षकाला आता माहितीचे ज्ञानात, आणि ज्ञानाचे शहाणपणात रूपांतर करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा द्यावी लागते. डिजिटल युगात शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम शिकवणारा नसून मार्गदर्शक, समुपदेशक, प्रेरणादाता आणि मूल्यसंस्कारक बनला पाहिजे. आधुनिक काळातील शिक्षकांची जबाबदारी बुद्धकालीन गुरूंहून अधिक व्यापक आहे. कारण आजची मुले केवळ परीक्षेतील गुणांसाठी शिकत नाहीत, तर त्यांना जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे आहे. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांत सर्जनशीलता, नवोन्मेष, तर्कशक्ती, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि मानवी मूल्ये रुजवावी लागतात. जसे बुद्धकालीन शिक्षकांनी शिष्यांना प्रश्न विचारायला, संवाद साधायला आणि सत्य शोधायला प्रवृत्त केले, तसेच आजचे शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला आणि समस्या सोडवायला शिकवतात.

बुद्धकालीन संदर्भ आणि आधुनिक संदर्भ यांची तुलना केली तर अनेक साम्यस्थळे दिसून येतात. बुद्धकालीन शिक्षकांनी समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमता दूर करण्यासाठी शिक्षणाचा वापर केला. आजचे शिक्षकही समाजातील पर्यावरण समस्या, हिंसा, डिजिटल व्यसन, सामाजिक माध्यमांचा गैरवापर, लिंगभेद, असमानता यांसारख्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांना संवेदनशील करतात. त्या काळात शिक्षकांनी शिष्यांना करुणा आणि समतेचे धडे दिले, तर आज शिक्षक विद्यार्थ्यांना मानवाधिकार, लोकशाही मूल्ये आणि शाश्वत विकास यांची जाण देतात. तथापि, आधुनिक शिक्षक अनेक आव्हानांशी सामना करीत आहेत. ग्रामीण भागातील शाळांची अपुरी साधनसामग्री, करारावर काम करणाऱ्या शिक्षकांची असुरक्षितता, प्रशासकीय कामाचा ताण, डिजिटल साधनांच्या अभावामुळे शिकवण्यातील अडचणी यामुळे शिक्षकांचे कार्य जड झाले आहे. तरीही जे शिक्षक आपले काम ध्येय मानतात, तेच खऱ्या अर्थाने बुद्धकालीन गुरुंच्या वारशाला न्याय देतात. जागतिक शिक्षक दिनाचा खरा अर्थ म्हणजे शिक्षकांच्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांच्या कार्याला योग्य सन्मान देणे. बुद्धकालीन संदर्भ सांगतो की शिक्षक हा केवळ माहिती देणारा नसून मूल्यांचा वाहक आहे. आधुनिक संदर्भ सांगतो की शिक्षकाला नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांना सुसंस्कारित नागरिक घडवावे लागते. म्हणूनच आज आपल्याला या दोन्ही परंपरांचा संगम साधावा लागेल.

5 ऑक्टोबर रोजी असणार्‍या जागतिक शिक्षक दिनानिमित्त आपण ठरवायला हवे की आपल्या शिक्षणव्यवस्थेत बुद्धकालीन मूल्यांचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालावा. शिक्षकांना योग्य प्रशिक्षण, संसाधने, मानवी सन्मान आणि प्रेरणा द्यावी. कारण राष्ट्राचे भविष्य शिक्षकांच्या हातात आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा वैज्ञानिक, नेता, समाजसुधारक, विचारवंत होणार आहे. त्यामुळे शिक्षकाची भूमिका केवळ वर्गखोल्यापुरती मर्यादित नसून समाजपरिवर्तनाची आहे. म्हणूनच आपण या दिवशी केवळ औपचारिक कार्यक्रमापुरते न थांबता शिक्षकांना खरे समर्थन द्यावे, त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहावे आणि शिक्षण अधिक न्याय्य, मूल्याधिष्ठित आणि समाजाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावे. बुद्धकालीन गुरूंनी दिलेली प्रेरणा आणि आधुनिक शिक्षकांचे ध्येय हे दोन्ही एकत्र केल्यासच मानवतेचे खरे कल्याण साध्य होईल.

डॉ. राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)

(9960103582, bagate.rajendra5@gmail.com)

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande