पालघर, 5 ऑक्टोबर, (हिं.स.)।
पर्यावरण रक्षणासाठी अनोखी व प्रेरणादायी अशी ‘एक झाड मनातले’ ही मोहीम पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील वक्षमित्र प्रकाश काळे यांनी हाती घेतली आहे. वयाच्या ७९व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असे कार्य ते करीत असून, या उपक्रमामुळे परिसरात हरितक्रांतीचा संदेश पसरत आहे.
गेल्या वर्षी काळे यांनी ‘एक झाड देशासाठी’ हा उपक्रम राबवला होता.
त्याच धर्तीवर यंदा नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत, नऊ गावांमध्ये उपयुक्त व दुर्मीळ झाडांची लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला.
या अंतर्गत आतापर्यंत नऊ गावांत ९८ प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
या वर्षीच्या मोहिमेत आतापर्यंत ८०० हून अधिक मौल्यवान व जातिवंत झाडांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये आंबा, चिकू, पेरू, फणस, रक्तचंदन, तसेच विविध मसाल्याच्या झाडांचा समावेश आहे. झाडे केवळ लावण्यावरच नव्हे, तर त्यांच्या संगोपनावरही भर देण्यात येतो.
झाड लावल्यानंतर संबंधित व्यक्ती त्या झाडाचा फोटो प्रकाश काळे यांना पाठवतात.
यामुळे उपक्रमाची पारदर्शकता आणि सातत्य टिकून राहते, असे ते सांगतात.
“अनेक ठिकाणी झाडे लावली जातात, पण ती केवळ फोटोपुरतीच मर्यादित राहतात.
माझ्या मोहिमेत लावलेली प्रत्येक झाडे जिवंत ठेवण्याचा संकल्प असतो.
ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर मात करण्यासाठी हा छोटासा पण परिणामकारक प्रयत्न आहे,”
असे प्रकाश काळे यांनी सांगितले.
काळे यांच्या ‘एक झाड मनातले’ या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरणपूरक विचारांची नवचेतना निर्माण झाली आहे.
तरुण व विद्यार्थीवर्ग त्यांच्याकडून प्रेरणा घेत हरित नवरात्र साजरे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL