लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
अहमदपूर तालुक्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका अज्ञात आरोपीने एका तरुणाची २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष भालचंद्र गायकवाड (२९, रा. किनगाव, ता. अहमदपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ ते १९ सप्टेंबर या दरम्यान ही फसवणूक झाली. अज्ञात आरोपींनी त्यांच्या मोबाइल क्रमांक वापर करून गायकवाड यांना MCN कंपनीमध्ये प्लेसमेंट सुपरवायझर किंवा ऑफिस स्टाफ पदावर नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यांच्याकडून २१,०००/- रुपये घेतले. मात्र, त्यांना नोकरी न लावता ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली.
फिर्यादी आशिष गायकवाड यांनी अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात आरोपीवर गुन्हा (क्र. ६६२/२०२५) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोह/१४४३ आरदवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, अहमदपूर पोलिसांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारे इतर कोणत्याही व्यक्तीची फसवणूक झाली असल्यास, त्यांनी त्वरित अहमदपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी नोकरी मिळवून देण्याच्या फसव्या जाहिरातींपासून आणि अज्ञात मोबाइल क्रमांकांवरून आलेल्या आमिषांपासून सतर्क राहणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis