अकोला, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।अकोला-वाशिम रोडवर भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून देण्यात आलीये. याच माहितीवरून उपमुख्यमंत्री कार्यालयातुन अकोल्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांना अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती नंतर बाजोरिया अपघात स्थळी पोहचलो मात्र हा फसवणूकीचा नवा फंडा असल्याचं समजताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आहे.
अपघात झाल्याची माहिती मिळताच अकोला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी तातडीने घटनास्थळी रवाना होत पातुरकडे तब्बल ४२ किलोमीटर अंतरावर पाहणी केली. मात्र, ठिकाणी कोणताही अपघात झाल्याचे दिसून आलं नाही.
सुमारे दोन तासांच्या कालावधीत फोन करणारा व्यक्ती वारंवार वेगवेगळ्या ठिकाणांहून नवी माहिती देत राहिला. इतकेच नव्हे, तर त्याने फोनपे द्वारे पैसे मागितले, ज्यामुळे संशय अधिक बळावला. अखेर हा कॉल फेक असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी त्याचा नंबर बंद करून ठेवला.
फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव प्रमोद फसाले असे सांगितले होते. एका उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर अशा प्रकारे खोटी माहिती दिल्यानंतरही कार्यकर्त्यांनी दाखवलेली तात्पर्यपूर्ण प्रतिक्रिया कौतुकास्पद ठरली आहे.
मात्र, अशा खोट्या कॉलमुळे खऱ्या गरजूंना वेळेवर रुग्णवाहिका आणि मदत मिळण्यात अडथळा येऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, खोटा कॉल करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आता याबाबत अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांनी ॲक्शन मोडवर येत कारवाईला सुरुवात केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे