वॉशिंग्टन, 5 ऑक्टोबर (हिं.स.)अमेरिका आणि भारत यांच्यातील हाय-व्होल्टेज चेकमेट बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात टीम अमेरिकेने भारताचा ५-० असा पराभव केला. पण या सामन्यातील सर्वात मोठे आकर्षण अमेरिकेचा विजय नव्हे तर हिकारू नाकामुराचा वादग्रस्त सेलिब्रेशन होते. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाकामुराने जागतिक विजेता डी. गुकेशचा पराभव करून अमेरिकेला आघाडी मिळवून दिली.
इतर सामन्यांमध्ये, फॅबियानो कारुआना अर्जुन एरिगाईसीचा पराभव केला. कॅरिसा यिपने दिव्या देशमुखचा पराभव केला, लेवी रोझमनने सागर शाहचा पराभव केला आणि तानी अदेवुमीने इथन वाझचा पराभव केला. पण नाकामुराचे सेलिब्रेशन चर्चेचा विषय बनला. विजयानंतर लगेचच त्याने गुकेशचा राजाचा मोहरा उचलला आणि प्रेक्षकांमध्ये फेकला, ज्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला. बुद्धीबळ चाहत्यांनी नाकामुरावर जोरदार टीका केली आहे.
डी. गुकेशने त्याच्या शांत आणि सन्माननीय प्रतिसादाने सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियावर त्याच्या संयम आणि खिलाडूवृत्तीचे कौतुक होत आहे. आता, सर्वांच्या नजरा चेकमेटच्या दुसऱ्या फेरीवर आहेत. जो लवकरच भारतात होणार आहे. दुसऱ्या फेरीत गुकेशला या पराभवाची रतफेड करण्याची सुवर्णसंधी मिळेल आणि चाहते आणखी एक रोमांचक सामना पाहतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे