कोल्हापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
सराफ व्यावसायिकांकडून चोरीची, संशयित मालमत्ता जप्त करताना तपासी अधिकाऱ्यांनी पाळावयाची मार्गदर्शक तत्त्वे तसेच सराफांच्या सुरक्षाविषयक समस्यांचे निराकरण करण्याबाबत राज्यस्तरीय दक्षता समितीची स्थापना राज्य शासनाने केली आहे. कोल्हापूरातील महेंद्र ज्वेलर्सचे मालक आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत सोनमल ओसवाल यांची राज्यस्तरीय दक्षता समितीवर निवड झाली आहे.
त्यानिमित्त बोलताना दक्षता समितीची स्थापना झाल्याने सराफ व्यावसायिकांची मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे पोलिस आणि सराफ व्यावसायिकांत समन्वय वाढेल, असे मत भरत ओसवाल यांनी व्यक्त केले.
या नव्याने स्थापन झालेल्या समितीमध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) अध्यक्ष, पोलिस महासंचालक यांचे विधी सल्लागार सदस्य, पोलिस अधीक्षक राज्य पोलिस नियंत्रण कक्ष सदस्य सचिव यांच्यासह राज्यातील सराफ व्यावसायिक यामध्ये अकोला येथील नितीन खंडेलवाल, राजेश रोकडे, नागपूर, शैलेश खरोटे, अकोला, सुधाकर टांक, नांदेड, किरण आंदिलकर, पुणे, महावीर गांधी, गिरीश देवरमणी, सोलापूर, अजित पेंडूरकर, सुभाष वडाला, मुंबई, राजेंद्र दिंडोरकर, नाशिक, अमोल ढोमणे, वर्धा यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातून भरत ओसवाल यांची सदस्य म्हणून निवड केली आहे.
दरम्यान, या समितीवर निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार चित्रा वाघ यांनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच समितीची बैठक घेणार आहेत. आमदार सौ. चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली येत्या १ नोव्हेंबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे सराफ व सुवर्ण व्यावसायिकांचा मेळावा घेणार असल्याचेही भरत ओसवाल यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar