अहिल्यानगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत पुरवेल, असे आश्वासन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी रविवारी (दि.५) दिले. ते अहिल्यानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को ऑपरेटिव्ह साखर कारखान्याच्या विस्तारित क्षमतेच्या उद्घाटनानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. अमित शहा हे अहिल्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी शिर्डी येथील साई बाबा मंदिरातही दर्शन घेतले. यावेळी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व अन्य नेते उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले की, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी त्यांना आश्वासन दिले आहे की, जसेच आम्हाला सविस्तर अहवाल प्राप्त होईल, तसेच पंतप्रधान शेतकऱ्यांच्या मदतीत कोणतीही विलंब करणार नाहीत.”
ते पुढे म्हणाले की, मागील वर्षीच्या मदतीपैकी केंद्र सरकारने आतापर्यंत ३,१३२ कोटी रुपये वितरित केले आहेत, ज्यामध्ये एप्रिल २०२५ मध्ये वितरित केलेले १,६३१ कोटी रुपये यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र सरकारनेही २,२१५ कोटी रुपयांची मदत वाटप केली आहे, ज्याचा ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
शहा म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. त्यांनी सांगितले, प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला ₹१०,००० रोख मदत आणि ३५ किलो अन्नधान्य वितरित करण्यात आले आहे. कर्जवसुलीवर तात्पुरती थांब, ई-केवायसी नियमांत अस्थायी शिथिलता, महसूल कर आणि शाळेच्या फीमध्ये सूट देण्यात आली आहे. पुढे अमित शहा यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला की, केंद्र व राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत आणि पुनर्वसन देतील.
या कार्यक्रमात अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतातील साखर सहकारी क्षेत्र झपाट्याने प्रगती करत आहे. त्यांनी सुचवले की, साखर कारखान्यांनी हंगाम नसताना मल्टी-फीड एथेनॉल उत्पादनावर भर द्यावा. त्यांनी सांगितले की, एथेनॉल मिश्रण धोरणामुळे सहकारी कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.
शनिवार रात्री शिर्डीत पोहोचलेल्या अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांच्यासोबत एक ४५ मिनिटांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
ही बैठक महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवर आणि प्रभावित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यावर केंद्रित होती. माहितीनुसार, या बैठकीत विविध विकास प्रकल्पांची आणि प्रशासनाच्या महत्त्वाच्या कामांचीही प्रगती तपासण्यात आली.
अलीकडेच राज्यात पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ सरकारी मदतीची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदत पॅकेजची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode