धाराशिव जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस; सोयाबीन पीक उद्ध्वस्त
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। धाराशिव तालुक्यातील सापनाई गावात आज, रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. ढगफुटीसदृश झालेल्या या पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि पाण्याचा प्रचंड लोंढा थेट शेतात घुसला. या प्रल
अ


छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। धाराशिव तालुक्यातील सापनाई गावात आज, रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. ढगफुटीसदृश झालेल्या या पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि पाण्याचा प्रचंड लोंढा थेट शेतात घुसला. या प्रलयंकारी प्रवाहामुळे सापनाई शिवारातील गट क्रमांक ६४ मधील सोयाबीनचे पीक शंभर टक्के नष्ट झाले असून, शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने जमीन खरडून गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पावसाने रौद्र रूप धारण केले. सापनाई गावाजवळील निता श्रीनिवास कुलकर्णी यांच्या मालकीच्या गट क्र. ६४ मध्ये पावसाचे पाणी वेगाने घुसले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, शेतातील उभे सोयाबीन पीक पूर्णपणे वाहून गेले आणि जमिनीचा वरचा सुपीक थरही खरडून गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतजमीन तात्पुरती लागवडीसाठी अयोग्य बनली आहे.

एका स्थानिक शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले, “या पावसाने आमचं सर्वस्व हिरावून नेलं आहे. मोठ्या कष्टाने तयार केलेली शेती डोळ्यादेखत वाहून गेली. आता शेत सपाट न राहता एखाद्या खोल दरीसारखं झालं आहे.”

या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. तहसीलदार आणि कृषी विभागाने घटनास्थळी येऊन त्वरित पंचनामे करावेत, तसेच आर्थिक मदत, पीकविमा भरपाई आणि खरडून गेलेल्या जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रशासनाने परिस्थितीचा प्राथमिक आढावा घेतला असला तरी, शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची तातडीने गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. या घटनेमुळे तालुक्यातील इतर शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande