जळगाव, 5 ऑक्टोबर, (हिं.स.) जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे एका घरावर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर अचानकपणे हल्ला चढविला आहे. गाडीवर आलेल्या आठ ते दहा जणांनी सुरवातीला दगडफेक केली. यानंतर गोळीबार केला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून कुटुंबीय देखील भयभीत झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील कुसुंबा या गावातील चंद्रशेखर त्र्यंबक पाटील यांच्या घरावर हल्ला झाला आहे. चंद्रशेखर पाटील हे कुरिअरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान पाटील हे कुटुंबियांसोबत घरात असताना जेवणाला बसलेले होते. याच वेळी अज्ञात हल्लेखोर घराच्या बाहेर आले. यानंतर त्यांनी त्यांच्या घरावर अचानकपणे हल्ला करत पसार झाले आहे. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही. या दरम्यान हल्लेखोरांनी घराबाहेर उभी असलेली दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी घराच्या दगडफेक केली. तसेच घराच्या दिशेने गोळीबार करत ३ राउंड फायर केले आहेत. मात्र हल्ल्या मागचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या घटनेने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला असून कुटुंबीय भयभीत झाले आहेत.दरम्यान घटना घडल्यानंतर लागलीच पोलीस गावात दाखल झाले. हल्ला करण्यात करण्यात आलेल्या पाटील यांच्या घराच्या समोर पोलीस बंदोबस्त आहे. पोलिसांना घराबाहेर बंदुकीच्या गोळीच्या २ रिकामी पुंगळी आणि घरामध्ये १ पुंगळी मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर