सिन्नर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
भाताच्या शेताला पाणी सोडण्यासाठी विहिरीवर गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढविल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र शौर्याने लढा देत शेतकऱ्याने बिबट्याच्या पोटात दोन जोरदार गुद्दे मारत स्वतःचा जीव वाचवला.
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे आज (रविवार) दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. बाळकृष्ण अर्जुन पवार (वय ५५) हे आपल्या शेतात भाताच्या लागवडीसाठी पाणी सोडण्यासाठी साई संस्थानजवळील नर्सरी परिसरातील विहिरीवर गेले होते. मोटरचे बटण सुरू करून मागे वळताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घेतली.
हल्ल्यात पवार खाली पडले असता बिबट्याने त्यांच्या तोंडावर चावा घेऊन गाल व ओठ जखमी केले, तसेच छाती आणि हातावर नखांनी ओरखडे मारले. जीवाच्या आकांताने झटापट करताना पवार यांनी बिबट्याच्या पोटात दोन जोरदार गुद्दे मारले. त्यामुळे बिबट्या घाबरून पळून गेला.
आरडाओरड ऐकून इतर शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी पवार यांना त्यांच्या मुलगा मिलिंद पवार यांनी तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV