कोलंबो, 5 ऑक्टोबर (हिं.स.) महिला विश्वचषकात भारताने पाकिस्तानला ८८ धावांनी पराभूत करत आपली विजयी मालिका सुरु ठेवली आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४३ षटकांत केवळ १५९ धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला. भारताकडून क्रांती गौड आणि दीप्ती शर्माने या सामन्यात प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणाला दोन विकेट्स घेण्यात यश आले. तीन विकेट्स घेणारी क्रांती गौड भारतीय संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी २४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव ५० षटकांत २४७ धावांवर आटोपला. या सामन्यात भारताची फलंदाजी लौकीकाला साजेशी झाली नाही. आणि एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तिने ६५ चेंडूंच्या डावात चार चौकार आणि एक षटकार मारला.
हरलीन व्यतिरिक्त, जेमिमा रॉड्रिग्जने ३२, प्रतीका रावलने ३१, स्मृती मानधना २३, दीप्ती शर्मा २५, स्नेह राणा २०, कर्णधार हरमनप्रीत कौर १९, क्रांती गौर ८ आणि श्रीचरनी १ धाव केली. रिचा घोषने २० चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३५ धावा करत नाबाद राहिली. पाकिस्तानकडून डायना बेगने चार, तर सादिया इक्बाल आणि कर्णधार फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रमीन शमीम आणि नशरा संधू यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे