बिहारमधील कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार नसतील – मुख्य निवडणूक आयुक्त
- उमेदवारांचे फोटो रंगीत असतील पाटणा, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। बिहारमधील कोणत्याही मतदान केंद्रावर १,२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत. तसेच, या निवडणुकीत उमेदवारांचे फोटो रंगीत असतील. असे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी दिली. रविवारी
Chief Election Commissioner (CEC) Gyanesh Kumar


Bihar Legislative Assembly Elections, 2025


- उमेदवारांचे फोटो रंगीत असतील

पाटणा, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। बिहारमधील कोणत्याही मतदान केंद्रावर १,२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत. तसेच, या निवडणुकीत उमेदवारांचे फोटो रंगीत असतील. असे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी दिली. रविवारी पाटणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बिहारमधील आगामी निवडणुकांची तयारी आणि नव्या सुधारणा याबाबत माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, बिहारमधील निवडणुकांसाठी सर्व तयारी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. राज्यात सुरू करण्यात आलेली विशेष सुधारणा मोहिम (एसआयआर) पूर्णपणे यशस्वी झाली असून, ती देशभरात लागू करण्यात येईल. ज्ञानेश कुमार म्हणाले की, एसआयआर हा मतदार यादीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि पारदर्शक उपक्रम ठरला आहे. तो २४ जून रोजी सुरू झाला आणि नियोजित वेळेत पूर्ण झाला. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे आणि अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो.

सीईसी यांनी सांगितले की, ९०,२१७ बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे बिहार देशातील प्रेरणास्थान ठरले आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, यावेळी बिहारमधील कोणत्याही मतदान केंद्रावर १,२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत. हे नियम आता देशभर लागू केले जातील, ज्यामुळे मतदान व्यवस्थापन अधिक सुकर आणि लोकाभिमुख होईल.

निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी आयोगाने अनेक नवकल्पना केल्या आहेत. आता बिहार निवडणुकीत उमेदवारांचे रंगीत फोटो ईव्हीएमवर दर्शवले जातील, ज्यामुळे मतदारांना उमेदवार ओळखणे सोपे जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर १०० टक्के वेबकास्टिंगची सुविधा असेल. तसेच, बिहारमध्ये वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म लागू केला जाणार असून, त्याद्वारे उमेदवार आणि मतदार दोघांनाही सोयीस्कर सेवा मिळतील.

सीईसी म्हणाले, मतदार आता त्यांच्या मोबाईल फोनसह मतदान केंद्रावर येऊ शकतात. मतदान करताना फोन मतदान केंद्राबाहेर ठेवावा लागेल, मात्र तो पूर्णतः प्रतिबंधित राहणार नाही. त्यांनी हेही स्पष्ट केले की, मतदान एजंट बूथ सेंटरपासून १०० मीटर अंतरावर बसू शकतील आणि प्रत्येक उमेदवाराला त्या परिसरात एजंट तैनात करण्याची मुभा असेल.

निवडणुकीपूर्वी सुधारणा प्रक्रिया अनिवार्य असल्याचे ज्ञानेश कुमार यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. निवडणुकीनंतर हे करण्यास काहीच अर्थ नाही.

त्यांनी सांगितले की, बीएलओंनी घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळली असून, १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत सर्व राजकीय पक्षांना दावे आणि आक्षेप सादर करण्याची संधी देण्यात आली होती.

मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत त्यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल घेतला जाईल. या प्रक्रियेत उमेदवारांचे मतदान एजंट सहभागी राहतील. प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या मतदान केंद्रावर मतदान एजंटला नामांकित करावे आणि मतदानाच्या सुरुवातीपूर्वी त्याला उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्तांनी भोजपुरी आणि मैथिली भाषेत मतदारांना संदेश दिला. भोजपुरीत त्यांनी म्हटले, “रउआ के कोटि-कोटि धन्यवाद जतावतानी,” तर मैथिलीमध्ये त्यांनी सांगितले, “बिहार के सब मतदाता के अभिनंदन करतनी.” त्यांनी मतदारांना आवाहन केले की, छठ सणाप्रमाणे निवडणुका उत्साहाने आणि शांततेत साजऱ्या करा.

यापूर्वी, ज्ञानेश कुमार यांनी बिहारमधील विविध राजकीय पक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या टप्प्यांबाबत चर्चा झाली. भाजपने निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याची मागणी केली, कारण त्यांचा दावा आहे की अनेक टप्प्यांमुळे मतदारांची गैरसोय होते आणि उमेदवारांना अधिक खर्च करावा लागतो. तर, जेडीयूने एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याचे सुचवले, कारण त्यांच्या मते बिहारमध्ये ना नक्षलवादाचे संकट आहे, ना कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न. आरजेडी आणि लोजपा (आर) यांनीही दोन टप्प्यांत मतदान घेण्याचे समर्थन केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले, आम्ही दोन टप्प्यांत निवडणुका घेण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे मतदारांना सोय होईल. तसेच, निवडणुकीनंतर मतदारांना वेळेवर मतदार स्लिप मिळतील याची खात्री करावी. त्यांनी सांगितले की, महिला अधिकाऱ्यांनी बुरखा घालून येणाऱ्या महिलांचे फोटो जुळवावेत, जेणेकरून ओळख निश्चित होईल.

आरजेडीने आयोगासमोर काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. त्यांनी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे अनिवार्य करावे, तसेच एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे एकाच बूथवर ठेवावीत अशी सूचना केली. त्यांनी हेही म्हटले की, निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा करणे हे मतदारांना आकर्षित करण्याचे प्रलोभन आहे आणि ते थांबवले पाहिजे.

भाजपने आयोगाला विनंती केली की, मागासवर्गीय भागात आणि जलस्रोतांच्या परिसरात निमलष्करी दल तैनात करावेत. अशा भागांत बूथ लुटण्याची शक्यता अधिक असल्याने सुरक्षेची तयारी बळकट केली जावी. त्यांनी हेही सांगितले की, मतदारांना वेबकास्टिंग, वेब पोर्टल आणि एसएमएसद्वारे सतर्क करणे आवश्यक आहे, मात्र मतदार स्लिपचा वापर ओळखपत्र म्हणून करणे टाळावे.

एकूणच, बिहार निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने व्यापक तयारी सुरू केली आहे. सुधारित मतदार यादी, पारदर्शक मतदान प्रक्रिया, वेबकास्टिंग आणि उमेदवारांचे रंगीत फोटो यामुळे या निवडणुका अधिक विश्वासार्ह आणि तंत्रज्ञाननिष्ठ ठरण्याची चिन्हे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचा हा लोकशाही उत्सव छठ सणासारखा पारदर्शक आणि शांततेत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande