पालघर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
प्रस्तावित मुरबे बंदर प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्या, दि. ६ ऑक्टोबर रोजी, जिल्हा क्रीडा संकुल, दांडेकर कॉलेजसमोर, पालघर येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी कडक बंदोबस्ताची तयारी केली असून नागरिकांना शांततेत, कायद्याचे पालन करून सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जनसुनावणी दरम्यान कोणतीही कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी व्यापक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये १२४ पोलीस अधिकारी, १०६९ पुरुष व महिला पोलिस अंमलदार, ८ स्ट्राइकिंग पथके, एक राज्य राखीव पोलीस दल (SRPF), दोन आरसीपी (Rapid Control Platoon), दोन जलद प्रतिसाद पथके (Quick Response Teams), याशिवाय, वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे ३ अधिकारी आणि ३२ अंमलदार नेमण्यात आले आहेत.
पालघर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जनसुनावणीदरम्यान आपली मते, निवेदने आणि अडचणी शांततेत मांडावीत, कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था भंग होईल असे कृत्य करू नये, तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.
“मुरबे बंदर जनसुनावणीदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पालघर पोलिस दल सज्ज आहे. नागरिकांनी प्रशासनावर विश्वास ठेवून शांततेत सहभाग घ्यावा व पोलिसांना सहकार्य करावे,” असे आवाहन यतिश देशमुख पोलीस अधीक्षक यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL