जळगाव, 5 ऑक्टोबर (हिं.स.) धन आणि साधन या दोन गोष्टी आवश्यक आहेतच परंतु घरातील संबंधापेक्षा त्यास अत्याधिक महत्व देणे यामुळे घर मंदिर बनत नसते, घरातील सदस्यांचे आपसातील प्रेमपूर्वक संबंधच घरास मंदिर बनण्यासाठी आवश्यक असते असे प्रतिपादन ढाके कॉलनीस्थित ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रावर आयोजित घर बने मंदिर या कार्यक्रमात राजस्थानहून आलेल्या ब्रह्माकुमारी गीता बहन यांनी केले.
“घर बनें मंदिर” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन देताना त्यापुढे म्हणाल्या की, आजच्या काळात तंत्रज्ञान आणि साधनांची वाढ झाली असली तरी मानवी नाती अधिकाधिक कमकुवत होत आहेत. “पूर्वी घरे कच्ची असायची पण नाती पक्की होती; आता घरे पक्की झाली, पण नाती कच्ची पडली आहेत,” असे त्यांनी सांगितले.
“वसुधैव कुटुंबकम्” ही भावना आजच्या समाजातून लोप पावत आहे. पूर्वी कुटुंब हे प्रेम, आपुलकी आणि एकोप्याची माळ होती; आता मात्र औपचारिकता आणि कृत्रिमतेच्या जाळ्यात अडकली आहे. आज अशी वेळ आली आहे की आईवडील आणि मुले एकमेकांशी बोलण्यासाठीही वेळ किंवा अपॉइंटमेंट ठरवतात.
र्व्हच्युअल सोशल पासून रिअल सोशल मध्ये जगा
सोशल मीडियाच्या अतिवापराबद्दल त्या पुढे म्हणाल्या, “आज लोक सोशल मीडियावर गुड मॉर्निंग, गुड नाईटचे संदेश पाठवतात, पण समोर भेटल्यावर एक स्मितहास्य किंवा अभिवादन देखील करत नाहीत.”त्यांनी सांगितले की, आजची मुले सांगून नव्हे तर पाहून शिकतात. जर आईवडील दिवसभर मोबाईलमध्ये गुंतलेले असतील तर मुलेही तसेच करतील. त्यामुळे कुटुंबात संवाद आणि एकत्र घालवलेला वेळ हेच खऱ्या प्रेमाचे मूळ आहे. घरात आपुलकी आणि प्रेम तेव्हाच निर्माण होते जेव्हा प्रत्येक सदस्य एकमेकांचा आदर करतो. पूर्वी गावे देखील एक कुटुंबासारखी होती; सर्वजण सुख-दुःख वाटून घेत होते. पण आता मदतीसाठीही भाड्याने लोक आणावे लागतात — रडण्यासाठी, हसण्यासाठीही भाड्याचे लोक मिळतात, ही खंत त्यांनी व्यक्त केली.
मातपित्यांना वृद्धाश्रमात पाठविणारे बनतात अनाथ
आजच्या सामाजिक परिस्थीतीवर भाष्य करतांना त्या म्हणाल्या की, मजबूत कुटुंबाची भिंत प्रेम आणि विश्वासाच्या सिमेंटवर उभी राहते. जसे भिंत विटा आणि सिमेंटने बनते, तसेच मजबूत कुटुंब नात्यांच्या विटा आणि विश्वासाच्या गाऱ्याने उभे राहते. वृद्धाश्रमांची वाढती संख्या हा समाजासाठी चिंतनाचा विषय आहे. “ज्या घरात आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवले जाते, ते घर प्रत्यक्षात अनाथाश्रम बनते, कारण आईवडील हेच त्या घराचे खरे नाथ असतात,” असे त्यांनी सांगितले.
अपरिहार्य बदल स्विकारा
सासू–सुनांच्या नात्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जसे समाजाने जुन्या टकटक करणाऱ्या फोनपासून स्मार्टफोनपर्यंतचा बदल स्वीकारला, तसेच जुन्या विचारांच्या सासूने सुनांना आणि नव्या विचारांच्या सुनांनी सासूंना स्वीकारले पाहिजे — तेव्हाच घरात सुख आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल.
असे बनवा घराला मंदिर :
घराला मंदिरासारखे पवित्र बनवण्यासाठी त्यांनी काही मार्गदर्शक सूत्रेही दिली —
* भगवानाला प्रसाद, भोग लावण्याची परंपरा घरातही जपा.
* मंदिरात ज्या प्रमाणे पादत्राणे घराच्या बाहेर काढतात तसेच घरात प्रवेश करतांना दुसऱ्यांच्या नकारात्मक विचारांची “धूळ” घरात आणू नका.
* प्रत्येक घरातील सदस्याला देवता मानून सन्मान करा.
* मंदिरात ज्या प्रमाणे घंटानाद मनाला प्रसन्न करतो तसे घरात मधुर भाषेचा वापर करा, कारण गोडवा नात्यांना घट्ट करतो.
* प्रामाणिक कमाईतून बनलेले अन्नच घरात शिजवा आणि खा.
* मंदिर आणि परीसर जसे स्वच्छ असते त्याच प्रमाणे मन आणि घर — दोन्हींची स्वच्छता राखा.
शेवटी त्यांनी सांगितले, “आता वेळ आली आहे की आपण फक्त घरात मंदिर, देव्हारा बांधू नये, तर घरालाच मंदिर बनवावे — जिथे प्रेम, सन्मान, शुद्धता आणि मधुरता हीच आराधना बनेल.”
कार्यक्रमाचे संचालन ब्रह्माकुमारी राज बहन यांनी केले. अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदीजी होत्या, तर आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी वर्षा बहन यांनी केले. मंचावर निलीमा बहन, ज्योस्तना बहन, उषा बहन आणि शोभा बहन उपस्थित होत्या.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर