नागरिकांच्या आरोग्यावर विषारी छटा टाकणाऱ्या भेसळखोरांना वेसण घाला - डॉ.हुलगेश चलवादी
पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। सणासुदीच्या काळात दूध,मिठाई, पनीर, तूप, सुकामेवा यासह विविध खाद्यपदार्थ आणि सर्वसामान्यांना दिला जाणाऱ्या शिधा मध्ये होणारी भेसळ चिंतेची बाब आहे. ही भेसळ केवळ नफेखोरी नसून नागरिकांच्या आरोग्यावर केलेला उघड हल्ला आहे. सर्वसाम
पुणे


पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। सणासुदीच्या काळात दूध,मिठाई, पनीर, तूप, सुकामेवा यासह विविध खाद्यपदार्थ आणि सर्वसामान्यांना दिला जाणाऱ्या शिधा मध्ये होणारी भेसळ चिंतेची बाब आहे. ही भेसळ केवळ नफेखोरी नसून नागरिकांच्या आरोग्यावर केलेला उघड हल्ला आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्यावर विषारी छटा टाकणाऱ्या भेसळखोरांना वेसण घालण्याची मागणी यानिमित्ताने बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी केली आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने आक्रामक कारवाई केली नाही, तर बसप कार्यकर्ते भेसळखोरांना चोपल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा देखील डॉ.चलवादी यांनी दिला.

दूध, मिठाई, शिधात केली जाणारी भेसळ म्हणजे समाजाच्या आरोग्याशी केलेली गद्दारी आहे. दुधात डिटर्जंट, यूरिया, कॉस्टिक सोडा, स्टार्च, फॉर्मेलिन, कृत्रिम दूध, रंगद्रव्ये वापरून भेसळ केली जाते. ही भेसळ आरोग्यसाठी घातक आहे. भेसळ करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींचा बंदोबस्त करणे हे प्रशासनाचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य आहे. अन्न व औषध प्रशासनांची पथकांनी केवळ शहरासह ग्रामीण भागात, बाजारपेठांमध्ये आणि लहान दुकानदारांकडे तपासण्या कराव्यात, असे आवाहन, डॉ.चलवादी यांनी केले.

खोट्या लेबलखाली निकृष्ट दर्जाचे गोडे, कृत्रिम रंग युक्त पनीर, रसायन मिसळलेले तूप बाजारात विकले जात आहे. यामुळे अनेकांना अपचन, अ‍ॅसिडिटी, त्वचाविकार, यकृत व किडनी विकार होतात.कित्येकदा हे प्रकरण मृत्यूपर्यंतही पोहोचते. तरीसुद्धा प्रशासन झोपले आहे का? असा संतप्त सवाल डॉ.चलवादींनी उपस्थित केला.

भेसळ करणाऱ्या कंपनी, दुकानदारांची नावे जाहीर करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. नागरिकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्यांना केवळ दंड व नोटिसा देऊन सोडणे हा भेसळखोरांना संरक्षण देण्यासारखा प्रकार आहे. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनीही आपल्या आरोग्याची जबाबदारी ओळखली पाहिजे. गोडधोड घेताना त्याची गुणवत्ता तपासावी. शंका आल्यास लगेच अन्न व औषध प्रशासनात तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ.चलवादींनी नागरिकांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande