पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्रात सध्या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत कशी करता येईल यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीचा तपशील देखील सांगितला.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, 'राज्यामध्ये आणि विशेषत मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकऱ्यांच आणि पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात ऊस महत्त्वाचे पीक आहे आणि आमच्याकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे.
पुरामध्ये काही ठिकाणी ऊस पडला आहे तर काही ठिकाणी तो वाहून गेला आहे. काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे या पुरात किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेण्याची गरज होती. त्याबाबतची चर्चा आज आम्ही केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.शरद पवार पुढे म्हणाले, उद्याच्या 12 तारखेला सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारसोबत झालेल्या नुकसानीबाबत कशा पद्धतीने चर्चा केली जाऊ शकते, याबाबत निर्णय घेण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु