पालघर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
विरार (पश्चिम) येथील मारंबळपाडा–जलसार या दरम्यान सुरू असलेल्या रो-रो सेवेचा रविवारी दुपारी सुरु झालेला प्रवास प्रवाशांसाठी त्रासदायक ठरला. दुपारी ३ वाजता जलसारहून सुटलेली रो-रो बोट सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतही मारंबळपाडा जेट्टीवर पोहोचू शकली नाही, परिणामी प्रवासी तब्बल दीड तासांहून अधिक काळ बोटीमध्येच अडकून पडले.
हेड्रॉलिक रॅम्पमध्ये बिघाड...
मिळालेल्या माहितीनुसार, रो-रो बोटीच्या हेड्रॉलिक रॅम्पमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती मारंबळपाडा येथील जेट्टीला लागू शकली नाही.
त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि अनेक तास बोटीतच थांबावे लागले.
या दरम्यान बोटीत उपस्थित प्रवाशांनी अस्वस्थता आणि नाराजी व्यक्त केली.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचा आरोप...
या बोटीतून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी शोशल मीडियावर सांगितले की, “दररोज या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले जातात.
आज देखील बोटीत गर्दी होती. सुरक्षा नियमांचेही पालन होत नसल्याचे बोलले जातं आहे. तर काही स्थानिक नागरिकांनीही या सेवेमध्ये सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.
पालिका प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी...
घटनेची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, समुद्री सुरक्षा यंत्रणेकडून तपास सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील रो-रो सेवेच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL