नाशिक, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। आदिवासी विकास विभागाकडून रविवारी (दि. ५) राणी दुर्गावती यांची जयंती साजरी करण्यात आली. आदिवासी विकास भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्या हस्ते राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी अपर आयुक्त दिनकर पावरा, उपायुक्त विनिता सोनवणे, शबरी आदिवासी विकास व वित्त महामंडळाच्या महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ, सहायक आयुक्त अरुणकुमार जाधव आदींसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
संदीप चंदनशिवे यांनी राणी दुर्गावती यांचा जीवनप्रवास उपस्थितांसमोर मांडला. यावेळी आदिवासी विकास आयुक्तालय, अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालय, आदिवासी विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ आदींचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या लाभार्थी महिलांचा आयुक्त बनसोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात सावित्रीबाई महिला ग्रामसंघाच्या सरला पवार, शकुंतला पवार, अकोले महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या लंका गोडे, कमल परते, हिमाई शेतकरी उत्पादक कंपनीच्या वंदना पवार, सुनीता भुसारे, ग्रामसभा कोष समितीच्या काकडीबाई दळवी, ज्योती मोंढे, कल्पतरू वन धन विकास केंद्राच्या गीतांजली महाले, ललिता गवळी यांचा समावेश होता. प्रियांका ढगे, ज्योती घोडे, मनिषा जाधव, शांताबाई भांगरे, ज्योती तिटकारे यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा कर्ज मंजूर आदेश देऊन गौरविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV