सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
कोजागिरी पोर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणार्या भाविक भक्तांसाठी विश्व हिंदु महासंघाच्या वतीने सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील उळे गावाजवळ मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार झंवर यांनी दिली.
विश्वहिंदु महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रेरणेतून ही सेवा करण्यात येत आहे. शनिवार दि. 4 ऑक्टोंबर रोजीपासून भाविक भक्त तुळजापूरकडे पायी चालत असताना त्यांना कोणत्याही आजाराचा त्रास होवू नये आणि त्यावर उपचार व्हावा यासाठी हे आरोग्य शिबीर आयोजित करून भाविकांची सेवा करण्यात येणार आहे. लाखों भाविक सोलापूर तुळजापूर या रस्त्यावरून पायी चालत तुळजापूरकडे दरवर्षी जात असतात यंदाही मोठ्या संख्येने भाविक जाणार आहेत त्यांना योग्य ते आरोग्यासाठीचे उपचार मिळावेत म्हणून विश्व हिंदु महासंघाने व्यवस्था केलेली आहे. उळे गावाजवळ रस्त्यावरच मोठे मंडप मारून तज्ञ डॉक्टर, नर्स आरोग्य सेवक तसेच विश्व हिंदु महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्य भाविकांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. नेहमी लागणारे औषधाचा पुरवठाही यावेळी करण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनित ढेपे, सोलापूर शहर अध्यक्ष उपेंद्र दासरी, जिल्हा संघटन मंत्री शशिकांत पगडे आणि शहर संघटन मंत्री रोहित परदेशी यांनी सांगितले. ही सेवा कोजागिरी पोर्णिमे पर्यत राहणार असून भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड