विदर्भने तिसऱ्यांदा जिंकला इराणी कप; रेस्ट ऑफ इंडियावर ९३ धावांनी मात
नागपूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)हर्ष दुबेच्या भेदक गोलंदाजीमुळे रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भने रेस्ट ऑफ इंडियाचा ९३ धावांनी पराभव करून इराणी कप पटकावला आहे. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने आपल्या पहिल्या डावात ३४२ धावा केल्या. आणि रेस्ट ऑफ इंडियाचा संघ २१४ ध
इराणी कप विजेता विदर्भाचा संघ


नागपूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)हर्ष दुबेच्या भेदक गोलंदाजीमुळे रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भने रेस्ट ऑफ इंडियाचा ९३ धावांनी पराभव करून इराणी कप पटकावला आहे. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने आपल्या पहिल्या डावात ३४२ धावा केल्या. आणि रेस्ट ऑफ इंडियाचा संघ २१४ धावांवर सर्वबाद झाला. यामुळे विदर्भाला पहिल्या डावात १२८ धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर विदर्भाने आपल्या दुसऱ्या डावात २३२ धावा केल्या आणि रेस्ट ऑफ इंडियाला ३६१ धावांचे आव्हान दिले होते. पण रेस्ट ऑफ इंडियाचा संघ दुसऱ्या डावात २६७ धावांवर ऑल आउट झाला आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

विदर्भाविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रेस्ट ऑफ इंडियाच्या फलंदाजीची कामगिरी अतिशय सुमार झाली. त्यांनी केवळ ८० धावांत 5 विकेट्स गमावल्या. त्यानंतर यश धुलने जबाबदारी स्वीकारली आणि संघाला लक्ष्याच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला. धुलने अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या मार्गावर होता. पण यश ठाकूरने त्याला बाद केले. ज्यामुळे तो ते साध्य करू शकला नाही. धुलने ११७ चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह ९२ धावा केल्या. त्यानंतर मानव सुथार शेवटपर्यंत खेळत राहिला. पण त्याला दुसऱ्या बाजूने त्याला चांगली साथ मिळाली नाही. सुथार ११३ चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांवर नाबाद राहिला. विदर्भाकडून हर्ष दुबेने चार विकेट्स घेतल्या. तर आदित्य ठाकरे आणि यश ठाकूरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पार्थ रेखाडे आणि दर्शन नालकांडे यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande