पालघर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
पालघर जिल्ह्यातील झाप ग्रामपंचायतीने ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार 2024-25’ प्राप्त करून जव्हार तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा पुरस्कार पालघर येथे शनिवारी पालक मंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी पालघर लोकसभा खासदार हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड, तसेच जव्हार प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांची उपस्थिती होती.
ग्रामपंचायतीच्या वतीने अधिकारी अमोल भोये, सरपंच एकनाथ पांडू दरोडा, उपसरपंच सखाराम वड, माजी सरपंच नामदेव गवारी तसेच सदस्य महेंद्र गवारी आणि विलास बागुल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या वेळी सरपंच एकनाथ दरोडा यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान केवळ ग्रामपंचायतीचा नसून संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याचा व सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे. भविष्यातही ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे झाप ग्रामपंचायत जिल्ह्यातील आदर्श व अग्रगण्य पंचायत म्हणून ओळखली जाईल,” असे त्यांनी नमूद केले.या यशाबद्दल सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत सरपंच व ग्रामपंचायतीच्या कार्याची प्रशंसा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL