- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय होणार सहभागी
मुंबई, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। मुंबईत 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्ये सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय सहभाग घेणार आहे. अधिकृत आकडेवारीचे विकसित होत असलेले परिदृश्य आणि डेटा यातील तफावत भरुन काढण्यातील फिनटेक ची भूमिका याबद्दलची माहिती एका समर्पित स्टॉल आणि विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
या कार्यक्रमात उभारण्यात येणाऱ्या मंत्रालयाच्या स्टॉल मध्ये जीडीपी, ग्राहक किंमत निर्देशांक, प्रमुख श्रम बाजारातील आकडेवारी इत्यादी प्रमुख सांख्यिकीय निर्देशकांविषयी माहिती दिली जाईल. ज्यातूनअधिकृत आकडेवारीतील पारदर्शकता, सहजसोपा प्रवेश आणि नवोन्मेष याबद्दलची मंत्रालयाची वचनबद्धता दिसून येईल. निमंत्रितांसाठी इन्फोग्राफिक्स, व्हिडिओ आणि परस्पर संवादी प्रदर्शनांसह नाविन्यपूर्ण दृश्यांचा तसेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या उपक्रमांचा वापर प्रभावी संवाद साधण्यासाठी केला जाईल. ग्लोबल फिनटेक फेस्ट मधील या लक्ष्यित संपर्क कार्यक्रमात यश मिळेल असा विश्वास आहे.
फिनटेक क्षेत्राची समृद्धी डेटावर अवलंबून असून मंत्रालय औद्योगिक बुद्धिमत्ता आणि अधिकृत आकडेवारी यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे. 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पॅनल संवादाचा विषय इनसाइट फ्यूजन: सर्वेक्षण आणि उद्योग विषयक डेटासह फिनटेकचे भविष्य घडवणे असा आहे. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीद्वारे मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेले सर्वेक्षण आणि बाजारपेठ विषयक डेटा एकमेकांना कशाप्रकारे पूरक ठरतील याविषयावर या संवादसत्रात मंत्रालय आणि प्रमुख उद्योगांचे प्रतिनिधी यांच्यात विचारविनिमय होईल. ग्राहकांचे वर्तन, उद्योगांच्या गरजा आणि आर्थिक समावेशकतेच्या तफावतींमध्ये सखोल अंतर्दृष्टी निर्माण करणे हा यामागील हेतू आहे. फिनटेक, धोरणकर्ते आणि संशोधकांनी अधिक लवचिक प्रारुप तयार करुन समावेशक उत्पादनांची रचना करणे आणि पुराव्यावर आधारित वृद्धीसाठी पथदर्शी योजना तयार करणे हे एक खुले आवाहन आहे.
8 ऑक्टोबर 2025 रोजी “सार्वजनिक हितासाठी डेटा: नवोन्मेष आणि विकासासाठी अधिकृत डेटाचा वापर” या विषयावर आयोजित फायरसाइड चॅटमध्ये मंत्रालयाचे सचिव सहभागी होतील. ज्यावेळी डेटाचा उपयोग सार्वजनिक कल्याणासाठी केला जातो तेव्हा नवीन आर्थिक क्षमतांचा शोध लागतो आणि सर्वसमावेशक विकास साध्य होतो. डिजिटल अर्थव्यवस्थेत या अंतर्दृष्टी सर्वांसाठी विशिष्ट कालमर्यादेत, पारदर्शक आणि सर्व हितधारकांसाठी लाभदायक असाव्यात यादृष्टीने सहयोगी डेटा रुपरेषेवर या संवादसत्रात विशेष भर दिला जाईल.
त्याच दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबर रोजी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव, फिनटेक उद्योग आणि आणि नियामकांच्या प्रतिनिधींसोबत डिजिटल इंडियासाठी सांख्यिकीय पायाभूत सुविधा : फिनटेक परिसंस्थेसोबत एक अधिक स्मार्ट डेटा भागीदारी या विषयावर बंद खोलीत होणाऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान भूषवतील. डिजिटल अर्थव्यवस्थेत अद्ययावत योजना आणि नवोन्मेष यांना चालना देण्यासाठी चैतन्यशील सांख्यिकीय पायाभूत सेवा सुविधा असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
या चर्चेत रिअल-टाइम ग्रॅन्युलर डेटा फ्लो अर्थात डेटा विश्लेषण आणि अंदाज यांमधील अचूकता या सध्याच्या आव्हानांचा समावेश असेल. तसेच विश्वासार्ह डेटा भागीदारी सह-निर्मितीच्या संधी आणि भौगोलिक संदर्भात भारताचा आर्थिक डेटा दर्शवणारे मॅपिंग आणि निर्णय घेण्याच्या चौकटींना बळकटी देण्यात फिनटेकची भूमिका यांचा समावेश असेल.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित त्यांच्या प्रमुख डिजिटल उत्पादनांवर आणि उच्च-गुणवत्ता असलेल्या, प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या अधिकृत आकडेवारीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकेल आणि या प्रक्रियेत फिनटेकना आमंत्रित करेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule