कमलताई, विरोधकांचे ट्रोलिंग आणि संघ उत्सव !
रिपब्लिकन जेष्ठ नेते स्व. रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या पत्नी आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषणजी गवई यांच्या मातोश्री, संपूर्ण अमरावती ज्यांना ''आईसाहेब'' असे संबोधते अशा कमलताई गवई यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावती म
कमलताई गवई संघ उत्सव


रिपब्लिकन जेष्ठ नेते स्व. रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या पत्नी आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषणजी गवई यांच्या मातोश्री, संपूर्ण अमरावती ज्यांना 'आईसाहेब' असे संबोधते अशा कमलताई गवई यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावती महानगराच्या विजयादशमी उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. या निमित्त माध्यमांवर उठलेल्या गदारोळानंतर कमलताई गवई उत्सवाला आल्या नाहीत. पण त्यांनी उत्सव प्रसंगी आपला आशयपूर्ण लिखित संदेश पाठवला. या संदेशात त्यांनी मानवतेचा विचार मांडला. कार्यक्रमाला शुभेच्छा पण दिल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनीही मानवी आणि संवैधानिक मुल्यांच्या माध्यमातून भारताला सक्षम राष्ट्र म्हणून विकसित करण्याची अधिक संधी आहे, अशी मौलिक अपेक्षा त्यांनी या संदेशात व्यक्त केली.

या विजयादशमी पासून संघाचे शताब्दी वर्ष सुरु झाले. परिणामी संघासोबत समाजही उत्साहात आहे. समाजाच्या सर्वच स्तरातून संघाविषयी संघकामाची दखल घेऊन शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. त्याच वेळी संघ विरोधक जिवाच्या आकांताने संघांविषयी गरळ ओकत आहे. संघाला कुणाच्या गरळ ओकण्याचा त्रास होत नाही. संघ त्याला फाट्यावर मारून आपले काम करत असतो. संघाने कमलताईंना निमंत्रित केल्यावर सगळ्यात पहिले अडचणीत आले ते संघद्वेषावर दुकान चालवणारे ठेकेदार. कमलताई गवई या सभ्य, सुविद्य, भगवान बुद्ध व आंबेडकरी विचारावर चालणाऱ्या सुसंस्कृत नेत्या आहेत. सर्वोच्च न्यायमूर्तींची आई किंवा मोठ्या नेत्याची पत्नी असण्याचा दुराभिमान त्यांनी कधी दर्शवला नाही. त्या अतिशय मनमिळाऊ आहेत. त्यांचा व्यापक संपर्क आहे. कमलताईंनी संघ उत्सवाला जाऊ नये असे वाटणाऱयांनी कमलताईंशी व्यवस्थित संवाद साधून त्यांना फेरविचाराची विनंती करणे वावगे नव्हते. कदाचित आपल्या पोकळ तर्कवादाला संवादात यश मिळणार नाही या शंकेने ग्रासलेल्या संघद्वेषी कंपूने थेट समाजमाध्यमांवर कमलताईंवर हल्ला सुरू केला. त्यांनी संघावर टीका केली याचे वैषम्य नाही. तो त्यांचा कायमचा धंदा आहे. त्यांनी टीकेचे लक्ष्य बनवले कमलताईंना. ज्या कमलताई 'भवतु सब्ब मंगलम' म्हणत सतत सर्वाना आशीर्वाद देत असतात, त्यांच्या बुद्ध व आंबेडकरी विचारांविषयी असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. या 'ट्रोलिंग' मध्ये त्यांनी वर्तमान मुख्य न्यायाधीश आणि स्व. दादासाहेब गवई यांना पण सोडले नाही. संघद्वेषाच्या आपल्या उद्योगाला ओहोटी लागू नये यासाठी ही मंडळी जोमाने भिडली होती. यासाठी त्यांना यावेळी कमलताई हे साधन मिळाले होते. प्रथम या कंपूने कमलताईंचे अक्षर नसलेले व सही पण नसलेले एक पत्र समाजमाध्यमांवर पसरवले. या पत्राचा आधार घेऊन संघाला टीकेचे लक्ष्य बनवले. सर्वसामान्य लोकांवर या ट्रोलिंगचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. कारण संघाने कमलताईंचे नाव त्यांची परवानगी घेऊनच पत्रिकेवर मुद्रित केले होते. कमलताईंनी पुरेसा वेळ घेऊन होकार कळवल्याची मला माहिती आहे. कमलताईंना निमंत्रीत केल्यावर त्यांनी काय बोलावे, कुठला विचार मांडावा, याचे अधिकार कमलताईंनाच होते. न पटणाऱ्या गोष्टी बोलण्याची पूर्ण मुभा होती. शिवाय, अतिथी म्हणून निमंत्रण स्वीकारल्याचा होकार त्यांनी स्वतः दिल्यावर त्यांनी काय बोलावे, हे काही संघाने त्यांना न सांगितले होते, न सुचविले होते.

माध्यमांवर गदारोळ वाढल्यावर कमलताईंचे दुसरे सुपुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन निमंत्रण स्वीकारल्याची कबुली दिली. मूळचे संघ स्वयंसेवक असलेल्या नेत्यांशी गवई कुटुंबाचे कसे संबंध राहिले आहे, याची अनेक उदाहरणे दिली. कमलताईंनी निमंत्रण स्वीकारले होते, या वाक्यानेच संघद्वेषी मंडळींची झोप उडाली. या प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर कंपूने कहर केला. वर्तमानातील नकली गांधीचे समर्थकही हिरीरीने पुढे आले. भाषेचा स्तर सोडून एक दबाव तयार केला गेला. प्रत्यक्षात थेट संघाशी व आंबेडकरी चळवळीशी संबंध नसलेल्या अनेकांनी कमलताई संघ उत्सवाला येणार आहेत, या बाबीचे मनपासून कौतुक व स्वागत केले. फार मोठी राजकीय परिपक्वता असल्याची प्रतिक्रिया आली. पण शंभर विधायक प्रतिक्रियांऐवजी दहा विध्वंसक प्रतिक्रिया स्मरणात राहतात, हा मानवी स्वभाव आहे. आपल्या घराण्याची कीर्ती कलंकित होऊ नये हा भाव कमलताईंनी आपल्या यापूर्वीच्या एका पत्रात लिहिण्याचे कारणच या विध्वंसक प्रतिक्रिया आहेत, हे कोणालाही समजू शकते.

संविधान, अभिव्यक्ति स्वातंत्र्य, लोकशाही याचा वारंवार आडोसा घेणारी मंडळी एवढी का अस्वस्थ व्हावी ? एरवी मतांच्या राजकारणासाठी धर्मनिरपेक्षतेचे कातडे पांघरायचे आणि सहिष्णुता दर्शवण्याची वेळ आली की आढयतेखोर भूमिका घ्यायची. संवाद साधण्यावरही, विचारांच्या आदान प्रदानावर आक्षेप घेणारे हेच का ते पुरोगामी ? दादासाहेब गवई, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे देखील संघात अतिथी म्हणून आले होते. खुलेपणाने त्यांनी त्यांचे विचार मांडले. कमलताईंचे विचार तुम्हाला पटले नसते तर तुमचा आक्षेप मान्य होता. नाहक सर्वमान्य धम्म उपासक आईसाहेबांची आपण अप्रतिष्ठा करतो आहोत, एवढा विवेकी विचारही झाला नाही ! कुठल्याही चळवळीत कवडीचे योगदान नसलेले उपटसुंभ आईसाहेबांना सल्ले द्यायला लागले. वैचारिक आदान प्रदानावर विश्वास नसलेली बांडगुळं अक्कल पाजळताना समोर दिसत होती !

कमलताईंना संघ उत्सवाला जाऊ दिले नाही, यात धन्यता मानणाऱ्या कंपूला संघ समजला नाही. तुमच्या टिनपाट विरोधाला संघ भीक घालत नाही. तुमच्या गदारोळाने संघाचे काहीच बिघडले नाही. उलट संघाच्या उत्सवात कमलताईंचा शुभेच्छा संदेश जसाच्या तसा वाचून दाखवला गेला. स्वतःवर झालेली टीका दुर्लक्षित करून आईसाहेबांनी शुभेच्छा संदेश पाठवला हे खरोखर त्यांचे मोठेपण !

संघाची शंभर वर्षांची पुण्याई एवढी मोठी आहे की विरोधकांच्या भिकार शब्दांचा समाजावर कुठलाच परिणाम होत नाही. संघाला सेवा, संस्कार, संघटन, समर्पण या तपश्चर्येची जोड आहे म्हणून शब्दांचे मंत्र होतात. म्हणूनच समाजाचा संघावर, संघाने दिलेल्या शब्दावर दृढ विश्वास आहे. पुढच्या शंभर वर्षात सशक्त, समर्थ, संघटित, एकसंध, अखंड भारत असे मोठे लक्ष्य घेऊन संघ पावले टाकायला सिद्ध झाला आहे.

- शिवराय कुळकर्णी

एक स्वयंसेवक

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande