मुंबई, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ प्रेक्षकांसाठी यंदाही खास पर्वणी असणार आहे. मालिकांमधील नायिकांइतकेच दमदार ठरलेले आपले लाडके नायक – आदित्य, सिद्धू, ऋषी, केदार, सारंग आणि अथर्व या वर्षी एका अनोख्या अॅक्टमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हा अॅक्ट अभिनय, स्टाईल आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर सादर होणारी एक दमदार कलाकृती असणार आहे. आदित्यचा आत्मविश्वास, सिद्धूचा मिश्कीलपणा, ऋषीचा ठामपण, केदारचा जोश, सारंगचं आकर्षण आणि अथर्वचा करिश्मा – हे सगळं एकत्रितपणे रंगमंचावर जिवंत होईल.
कलाकारांनी आपला अनुभव व्यक्त करताना काही किस्से ही सांगितले. स्वराज नागरगोजे म्हणजेच केदार म्हणाला झी मराठी अवॉर्ड्स वर परफॉर्म करण माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झाल्यासारखं वाटलं . पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मंचावर परफॉर्म करत होतो, पण इतर सगळे सह कलाकार इतके सहकार्य करत होते की एक क्षणही नवखेपण जाणवलं नाही. आमचे कोरिओग्राफर आशिष पाटील आणि त्यांच्या टीमने इतकं छान मार्गदर्शन केलं की आत्मविश्वास वाढला. माझी एन्ट्री मला खूप आवडली आणि आता टेलिव्हिजनवर ती कशी दिसेल हे पाहायला फारच उत्सुक आहे.
साईंकित कामत म्हणजेच सारंगने सांगितले यावर्षी झी मराठी अवॉर्ड्समध्ये बॉईज अॅक्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या डांस स्टाईल्स सादर केल्या आहेत. माझी स्टाईल होती रोबोटिक डांस जी माझ्यासाठी एकदम नवीन, वेगळी आणि कठीण होती! मला बॉलिवूड स्टाईल जमते, पण हे वेगळं होतं. दोन दिवसांत आम्ही सगळ्यांनी नवीन डांस स्टाईल शिकलो. मी बराच गडबडत होतो, त्यामुळे इतर मुलं बसून माझा डांस बघत होती, थट्टाही करत होती, पण याच गोष्टी आठवणी बनतात. सराव, मस्ती आणि नृत्य याचं हे सुंदर मिश्रण होतं.
झी मराठी अवॉर्ड्स २०२५ हा सोहळा यंदाही केवळ पुरस्कारांचा नव्हे, तर मनोरंजनाचा महाउत्सव ठरणार आहे. लाडक्या नायकांचा हा अॅक्ट, त्यांची मेहनत आणि प्रेक्षकांप्रती असलेलं प्रेम या वर्षीच्या सोहळ्याला आणखी खास बनवणार आहे. हा जबरदस्त सोहळा पाहायला विसरू नका ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी संध्या ७ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर!
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule