जळगाव, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील एकूण १३ जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
माजी पंचायत समिती सभापती मोहन सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडी कढोली येथे जुन्या वैमनस्यातून हा वाद उफाळून आला. विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की करण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन्ही गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात तुफान मारामारी झाली. या हाणामारीत दोन्ही बाजूचे मिळून एकूण १३ जण जखमी झाले आहेत, ज्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, जखमींना तत्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दोन्ही गट पुन्हा आमनेसामने येताच तणाव निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. या घटनेमुळे खेडी कढोली गावात एकच खळबळ उडाली असून, अद्याप या प्रकरणी कोणतीही पोलिस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर