वॉशिंग्टन , 7 ऑक्टोबर (हिं.स.)। अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील फोर्ट वर्थ शहरात २३ वर्षीय भारतीय विद्यार्थी चंद्रशेखर पोल यांच्या हत्येप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीचे नाव रिचर्ड फ्लोरेज असून तो नॉर्थ रिचलँड हिल्स येथील रहिवासी आहे, ज्याने शुक्रवार(दि.३) रात्री ईस्टचेज पार्कवेवरील एका गॅस स्टेशनवर काम करत असलेल्या चंद्रशेखर पोल यांना गोळी मारली आणि घटनेनंतर तिथून पळून गेला. घटनेनंतर काही वेळातच आरोपीने सुमारे एक मैल दूर असलेल्या दुसऱ्या वाहनावरही गोळीबार केला, पण सुदैवाने तिथे कोणीही जखमी झाले नाही. यानंतर त्याने जवळच असलेल्या एका घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या कारने त्या घराच्या गेटला धडक दिली.पोलिसांनी त्याला तेथेच अटक केली. फोर्ट वर्थ पोलीस विभागाचे प्रवक्ते ब्रॅड पेरेज यांनी सांगितले की, “आरोपीच्या कारमधून बंदूक जप्त करण्यात आली आहे. सध्या तो रुग्णालयात दाखल आहे, मात्र त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” ह्यूस्टनमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या हत्येवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ते चंद्रशेखर पोल यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत आणि त्यांचे पार्थिव भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेत मदत करत आहेत.” स्थानिक भारतीय-अमेरिकन समुदाय आणि विदेशी विद्यार्थी या घटनेमुळे अत्यंत दुःखी आणि भयभीत आहेत.त्यांचे म्हणणे आहे की, “अलीकडच्या काही महिन्यांत भारतीय विद्यार्थ्यांवर वाढणारे हल्ले आणि रहस्यमय मृत्यू यामुळे सुरक्षा संदर्भात चिंता वाढली आहे.” चंद्रशेखर पोल यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि पार्थिव भारतात पाठवण्यासाठी एक ‘गोफंडमी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. चंद्रशेखर पोल हे तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी होते. त्यांनी बीडीएस पूर्ण केले होते आणि दोन वर्षांपूर्वी डेटा अॅनालिटिक्समध्ये मास्टर्ससाठी अमेरिका गाठली होती.ते नॉर्थ टेक्सास युनिव्हर्सिटी, डेंटन येथून सहा महिन्यांपूर्वीच एमएस पूर्ण करून नोकरीच्या शोधात होते. त्यांचे बंधू दामोदर पोल यांनी सांगितले की, “स्वतःच्या खर्चासाठी ते गॅस स्टेशनवर पार्ट-टाइम काम करत होते.” ही घटना अमेरिका मध्ये घडलेली पहिलीच नाही.जानेवारी 2025 मध्ये, कनेक्टिकट येथे तेलंगणाच्या 26 वर्षीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. रंगारेड्डी जिल्ह्यातील एका युवकाचा अमेरिकेत संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. सप्टेंबर 2025 मध्ये, महबूबनगर जिल्ह्यातील 30 वर्षीय युवकाला कॅलिफोर्नियामध्ये पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले, जेव्हा त्याचा रूममेटसोबत वाद झाला होता. या घटनांनंतर भारतीय दूतावासांना हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी लागली आहे. अनेक वेळा शव भारतात पाठवण्यासाठी आठवडे लागतात, कारण या प्रक्रियेमध्ये कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी येतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode