नाशिक, 8 ऑक्टोबर (हिं.स.) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे १,५३१ गावांतील दोन लाख ८६ हजार २१८ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. तीन लाख १२ हजार ५९८ शेतकऱ्यांची पिके मातीमोल झाली आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया शासकीय स्तरावरून सुरू आहे.
प्राथमिक अहवालानुसार, २८६,२१८,१८ हेक्टर क्षेत्रातील पिकांवर फटका बसला आहे. त्यांपैकी १,८४८१९.९५ हेक्टर क्षेत्रासाठी आतापर्यंत १,१३० पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, अजूनही १०१३९८.२३ हेक्टर क्षेत्रासाठी ४०१ पंचनामे प्रलंबित आहेत. एकूण १५ तालुक्यांत नुकसानाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीमुळे कांदा, द्राक्षबाग, फुलशेती, तसेच भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या भागांत विक्रमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
शासनाने त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना केल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांसह स्थानिक तलाठी आणि कार्यालयीन कर्मचारी कामाला लावण्यात आले आहेत. जिल्ह्यात १९८ मंडळांत जोरदार पाऊस झाल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अधिकारी, कर्मचारी पोहोचले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV