परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
येथील क्रांती नगरातील शेख जावेद शेख युसूफ या व्यक्तीच्या खून प्रकरणात जावेद खान गफार खान या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु.एम. नंदेश्वर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
येथील कोतवाली पोलिस ठाण्यात 18 जून 2022 रोजी परवीन बेगम शेख जावेद या महिलेने एक तक्रार दाखल केली. त्याद्वारे, तीचे पती शेख जावेद शेख युसूफ यांचा आरोपी जावेद खान गफार खान याने कुर्हाडीने गळ्यावर, डोक्यावर वार करीत निर्घृण खून केल्याचे नमूद केले. आरोपी जावेद खान याचा अवैध गॅस विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने पंधरा दिवसांपूर्वीच आपले पती शेख जावेद यांच्याकडून गॅस सिलेंडर नेले परंतु, ते सिलेंडर परत आणून दिले नाही. जेव्हा 17 जून 2022 रोजी घरचा गॅस संपल्याने रात्री 8 वाजता आपले पती शेख जावेद यांनी जावेद खान याच्याकडून गॅसची टाकी घेऊन येतो म्हणून घर सोडले, आरोपी जावेद खान यास गाठून गॅस सिलेंडर मागितले, त्यावेळी सिलेंडर मागितल्याबद्दल जावेद खान याने रागाच्या भारात शिवीगाळ सुरु करीत त्याच्या हातातील कुर्हाडीने आपले पती शेख जावेद यांच्या गळ्यावर, डोक्यावर वार केले. ते रक्त बंबाळ होऊन खाली पडल्यानंतर आरोपी पळून गेला, असेही तक्रारीत नमूद केले.
या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुध्द कलम 302 व 504 भादंवि प्रमाणे तपासणीक अंमलदार शरद जराडे यांनी गुन्हा नोंदवून आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात खटला उभा राहिल्यानंतर जिल्हा सरकारी वकील अॅड. यु.डी. दराडे यांनी सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले, कोर्ट पैरवी अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, कोर्ट पैरवी भागोजी कुंडगीर यांनी सहकार्य केले. या प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार, वैद्यकीय पुरावा व घटनास्थळावरुन कुर्हाड जप्तीचा पुरावा महत्वाचा ठरला. न्यायालयाने आज बुधवार 8 ऑक्टोंबर रोजी आजन्म कारावास, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis