नांदेड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
नांदेड जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांना शेतीची जमीन देण्यासाठी शासनामार्फत एक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर सिंचित शेती देण्यात येणार आहे.
या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. पात्र आदिवासी नागरिकांनी आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रे प्रकल्प कार्यालय किनवट येथे सादर करावीत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर अशी निश्चित करण्यात आली आहे.
सदर योजना ही शासन निर्णय क्र. एपीजी-२०१८/प्र.क्र.१२७/१८, दिनांक २८ जुलै २०२१ अन्वये राबविण्यात येत असून या माध्यमातून भूमिहीन आदिवासींना स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ही माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जितेंद्रचन्द्रा दोन्तुला यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis