जळगाव, 8 ऑक्टोबर (हिं.स.) | शहरातील औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) परिसरात पहाटेच्या काळोखात चोरट्याने दोन कंपन्यांमधून २ लाख रुपयांची रोकड लंपास केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पूनम पेंट कंपनीचे शटरचे कुलूप तोडले आणि शटर उचकवून आत प्रवेश केला. तेथून ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. त्याच रात्री ई सेक्टरमधील छबी इलेक्ट्रीकल कंपनीतही असाच हल्ला करून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली. सकाळी कंपन्यांमध्ये पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. फिर्यादी विजय गोविंद वाघुळदे (५४, रा. मुंदडा नगर) यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.
तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात झाली असून, संशयिताच्या शोधासाठी गस्त वाढवण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलिस नाईक प्रदीप चौधरी यांनी सांगितले की, चोरट्याच्या हालचालींचा उलगडा लवकरच होईल आणि परिसरातील सुरक्षिततेसाठी विशेष मोहीम राबवली जाईल. एमआयडीसी क्षेत्रात अशा चोऱ्या वाढत असल्याने उद्योजक संघटनेनेही पोलिसांना भेट देऊन तक्रार केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर