छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
जालना शहरातील सिरसवाडी रोडवर टी. व्ही. सेंटर जवळ महिला व बालविकास कार्यालयाकडून विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या कुलभैय्या अनाथालयाची (शिशुगृहाची) जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देऊन पाहणी केली.
सदरील शिशुगृहात 0 ते 6 वर्षापर्यंतच्या कुमारी मातांची मुले, मुलांमध्ये ज्यांचे आई-वडील दोघेही मृत आहेत अशी अनाथ मुले, जन्मानंतर पालकांनी सोडून दिलेली किंवा रस्त्यावर, रुग्णालयात आढळलेली मुले यात ,कायद्याच्या संरक्षणाखालील मुले यात बाल न्याय (संरक्षण व काळजी) अधिनियम 2015 अंतर्गत येणारी मुले, विशेष काळजीची गरज असलेली मुले ज्यांना विशेष काळजी व सुविधा आवश्यक असतात यांचा समावेश होतो. सद्यस्थितीत या ठिकाणी 3 मुली आहेत. व यांची काळजी घेण्यासाठी महिला कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी याठिकाणी मुलांना बालस्नेही वातावरण निर्माण करणे, मुलांना खेळणी उपलब्ध करुन देणे तसेच परिसरात मुलांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे याबाबत आदेशित केले. तसेच जिल्हातील दानशूर व्यक्ती, सामाजिक स्वयंसेवी संस्था यांनी याठिकाणी राहत असलेल्या मुलांना मदत करण्याचे आवाहन केले. महिला व बालविकास कार्यालयाकडून या मुलींना दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा महिला बालविकास अधिकारी राजेंद्र कड, परिविक्षा अधिकारी अमोल राठोड यांच्या सह शिशुगृहातील कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis