परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना संकटाच्या या काळात मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून या पॅकेजनुसार या जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील आपदग्रस्त शेतकर्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
पालकमंत्री सौ. साकोरे बोर्डीकर यांच्या जिंतूर रस्त्यावरील जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटींग, सौ. प्रेरणा वरपुडकर, बाळासाहेब जाधव, विलास बाबर, सचिन अंबिलवादे, मोहन कुलकर्णी, मंगल मुदगलकर, एन.डी. देशमुख, मनिषा जाधव, सारिका पारवे, भरत जाधव ,दिनेश नरवाडकर यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित होती.
पालकमंत्री सौ. साकोरे यांनी जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये 52 महसूल मंडळे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त 9 तालुके व 52 मंडळांमध्ये मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 65 मिलीमिटर पावसाची अट वगैरे न लादता शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली आहे, असे नमूद केले.
नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 31 हजार 628 कोटींच्या मदतीचे पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे. जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न राहणार असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचेही सौ. साकोरे यांनी म्हटले.
अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकर्यांसह पिके, जनावरे, गोठे, दुकाने, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही जणांचे मृत्यूही झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर शेतकर्यांच्या बांधापर्यंत दौरे केले. काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन नुकसानग्रस्तांना तातडीची 10 हजार रुपयांची मदत, गहू, तांदूळ आदी मदतही दिली. यासाठी 2200 कोटी रुपयांचा पहिला हप्ता तातडीने मंजूर करण्यात आला, असेही पालकमंत्री सौ. साकोरे यांनी निदर्शनास आणून दिले.
विमाधारक शेतकर्यांना लवकर मदत मिळवून देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मुख्यमंत्री फडणवीस हे पाठपुरावा करीत आहेत. विमाधारकांव्यतिरिक्त इतर शेतकर्यांनाही 17 हजार रुपये प्रति हेक्टरी इतकी रक्कम दिली जाणार आहे. या भरपाईसाठी 18 हजार कोटींहून अधिकची तरतूद केली जाणार असल्याचेही सौ. साकोरे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जून, जूलै, ऑगस्ट या महिन्यामधील अतिवृष्टीबाबत 128 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य यापूर्वीच वितरित केले आहे. बळीराजा जर दुःखी असेल तर बळीराजाच्या मदतीसाठी हे सरकार निश्चितपणे धाऊन जाईल, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारंवार सांगितले होते. त्यामुळे सर्व निकष बाजूला ठेवून ही मदत देण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच अतिवृष्टीमुळे विहीरीत गाळ साचला. त्या प्रत्येकाला 30 हजार रुपयांचे अनुदान मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या व्यतिरिक्त पीक कर्ज वसूली स्थगिती, वीज बिल वसूलीमध्ये स्थगिती वगैरेंचेही निर्णय घेतले आहेत, हे ही निदर्शनास आणून दिले.
या जिल्ह्यात अतिवृष्टीने पुल, रस्ते यासह अन्य इमारतींचे अतोनात असे नुकसान झाले आहे, हे ही पालकमंत्री सौ. साकोरे यांनी नमूद केले. आतापर्यंत पडलेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सर्व आपदग्रस्तांना मदतीचा हात निश्चितच दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis