रत्नागिरी : लोकसहभागातून साडेतीन एकर जागेत साकारतेय देवराई
रत्नागिरी, 8 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूणचे : प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणजवळील कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या साडेतीन एकर पडीक जमिनीत सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, लोकसहभाग आणि सीएसआर फंडातून देवराई उभारणी सुरू झा
चिपळूणच्या देवराईच्या ठिकाणाची पाहणी


रत्नागिरी, 8 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूणचे : प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणजवळील कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या साडेतीन एकर पडीक जमिनीत सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, लोकसहभाग आणि सीएसआर फंडातून देवराई उभारणी सुरू झाली आहे. या उपक्रमाचे निरीक्षण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात चतुरंग प्रतिष्ठानच्या पुढाकाराने पार पडलेल्या “गोष्ट संयुक्त संगीत मानापमानाची” या नाटकातील कलाकारांनीही केले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी कलाकारांना उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी कास्टिंग डिरेक्टर निरंजन जावीर, आशीष वझे आणि आशाष नेवाळकर आदी उपस्थित होते. कलाकारांनी या पर्यावरणीय उपक्रमाचे कौतुक केले. कळंबस्ते येथील साडेतीन एकर पडीक जागेत उभारल्या जाणाऱ्या देवराईत २००हून अधिक देशी प्रजातीची झाडे लावली जाणार आहेत. पावसाळा सुरू होताच रोपांची लागवड केली जाईल. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून विविध खासगी कंपन्या, सामाजिक संस्थां, मंडळे आणि दानशूरांचा सहभाग लाभत आहे. ही जागा अनेक वर्षे पडीक होती. रेल्वे फाटक येथील मुख्य रस्त्यालगत जागा असल्याने देवराईसाठी योग्य ठरली. जिल्हाधिकाऱ्यांनी देवराई प्रकल्पाला मान्यता दिली आहे. जागेचे सपाटीकरण करण्यात आले असून झाडांच्या सुरक्षिततेसाठी चारही बाजूंना तारेचे कुंपण बसवले गेले आहे. झाडांमध्ये आवश्यक अंतर ठेवून नियोजनबद्ध लागवड केली जाईल. झाडांना नियमित पाणी मिळण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमी भाऊ काटदरे, तहसीलदार प्रवीण लोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, महसूल व वन विभागाचे अधिकारी, पंचायत समिती, लोटे एमआयडीसीतील कंपन्या, क्रिडाई आणि विविध सेवाभावी संस्था व शासकीय कार्यालये यांचा या प्रकल्पात सहभाग आहे. झाडांची माहिती देणारे फलक आणि त्याचा क्यूआर कोड झाडांच्या मध्यभागी लावण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांना विविध झाडांची माहिती सहज मिळू शकेल. ही हिरवीगार देवराई चिपळूण परिसराच्या पर्यावरणीय आणि नैसर्गिक वैभवात भर टाकेल आणि भविष्यातही बहरत राहील, असा विश्वास यावेळी कास्टिंग डिरेक्टर निरंजन जावीर यांनी व्यक्त केला. उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि संस्था एकत्रितरीत्या काम करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande