जालना, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।
ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव सविता चौधर, जिपचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) उदयसिंग राजपूत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, अन्न व औषध सहा. आयुक्त निखील कुलकर्णी, वैधमापनचे श्री. दराडे बीएसएनएलचे प्रदिपकुमार इंगळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती मैत्रेवार यांनी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारी त्वरित सोडविणे असल्याचे सांगितले. ग्राहकांच्या हितांचे संरक्षण व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीची हि बैठक असल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे अर्ज या बैठकीत सादर करावेत. तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संबंधीत राशन कार्ड वितरण, दुरुस्ती, नाव वगळणे ही कामे वेळेत करावी.
याबाबत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील राशन दूकानात स्वस्त धान्याचे दरपत्रकाचे फलक तसेच ग्राहकांना नियमानुसार किती राशन मिळते याचे दर्शनी भागात माहिती फलक लावावेत. जास्तीचे दर आकारणी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी. लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनद्वारे नियमानुसार धान्य वितरीत करावे. स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणारे कर्मचारी ग्राहकांकडून अतिरिक्त रुपयांची मागणी करतांना निदर्शनास आले असुन, यापुढे कोणीही ग्राहकाकडून अतिरिक्त रुपयांची मागणी केल्यास संबंधीतावर फौजदारी कारवाई करण्यात येणार. तसेच सद्या सण व उत्सावाचा कालावधी सुरु असुन, या कालावधीत भेसळयुक्त खव्याची विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवा किंवा मिठाई विक्री करणाऱ्यांची अन्न् व औषध प्रशासनाने तपासणी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. महावितरणने वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करावे. सर्व संबंधीत विभागांनी त्यांच्याशी संबंधीत तक्रारींची दखल घेवून, याबाबत योग्य कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती मैत्रेवार यांनी दिल्या.
यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये राशन दूकानात धान्य वाटप केल्यास ग्राहकांना पावती मिळत नाही, घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक ठिकाणी वापर. गॅस वितरण कंपनीकडून घरगुती गॅस डिलिव्हरी करतांना 40 ते 50 अधिक रुपयाची मागणी, बदनापूर तालूक्यातील मौ. वाहेगाव येथील समस्या, जालना शहरातील नागरीकांना देण्यात येणारी चुकीच्या रक्कमेची वीज बिले, जालना शहरातील रस्त्यांवर बंद पडलेल्या इंटरनेटच्या केबल आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव सविता चौधर यांनी प्रास्ताविकात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उद्दीष्ट सांगुन मागील बैठकीबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच ग्राहकांच्या संबंधाने काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास, त्याकरीता जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्याचे jalna.nic.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल (फॉर्म) सुविधा उपलब्ध करुन दिली असुन, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर करव्यात असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis