नाशिक, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। : दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. मानसिक आजार, ताण आणि तणाव यात गेल्या काही वर्षांपासून वाढ झालेली आहे. विशेषत: कोविड-१९ नंतरच्या काळात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये, सर्व वयोगटांत तसेच जगाच्या सर्वच भागांमध्ये मानसिक आरोग्याचे महत्त्व वाढू लागले आहे. या विषयावर जनजागृती करण्यासाठी आणि समाजात त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी हा दिन आयोजित केला जातो.
याचे औचित्य साधून मनोदय माईंड केअर क्लिनिक, सनशाईन काउन्सिलिंग अँड थेरपी सेंटर तसेच एम्पथी फाउंडेशन यांच्यातर्फे काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मानसिक आरोग्यावर काम करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा घ्यावा, असे येथील मुख्य मानसोपचार तज्ञ डॉ हेमंत सोननीस यांनी सांगितले.
१० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत कुसुमाग्रज स्मारक हॉल येथे विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सध्या शाळकरी आणि किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच भविष्यात ही पिढी मोठी होऊन समाजाचा कणा होणार आहे, हे लक्षात घेऊन १० ते १२ आणि १३ ते १५ वर्षे असे दोन वयोगट करून त्यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, प्रवेश विनामूल्य आहे आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. सहभाग घेण्यासाठी ९२८४३८५०३९ या क्रमांकावर संपर्क साधावा. . नितेश नळे, मानसशास्त्रज्ञ यासाठी मदत करतील. वक्तृत्व स्पर्धेसाठी १० ते १२ वयोगटासाठी: मानसिक आरोग्य म्हणजे काय? १३ ते १५ वयोगटासाठी: मानसिक आरोग्य: समज आणि गैरसमज आदी विषय आहे.. या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञ डॉ. सुप्रिया मालसाने, रसिका भोरे यांच्या मदतीने डॉ सोननीस महिलांचे मानसिक आरोग्य, ज्येष्ठांचे (वयोवृद्धांचे) मानसिक आरोग्य, तसेच इतर काही महत्त्वाच्या पैलूंवरदेखील चर्चा करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV